ठाणे - कल्याण डोंबिवली शहरात कोरोनाचा कहर सुरू असून मागील २४ तासात ६०६ नवे रुग्ण आढळून आले. या संख्येसह महापालिका क्षेत्रातील एकूण रुग्णसंख्या ११ हजार ५४६ वर पोहोचली आहे. तर रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने रुग्णांवर उपचार करायचे कुठे? हा प्रश्न पालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. अशात महापालिका आयुक्तांनी १२ जुलैपर्यत असणाऱ्या लॉकडाऊन वाढवला आहे. कल्याण डोंबिवलीत आता १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.
कोरोना रुग्णाचा संसर्ग मोठा प्रमाणात चाळ आणि झोपडपट्ट्यासह उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वाढल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत कोरोनामुळे १७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ६ हजार ७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय ५ हजार २९२ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २ जुलैपासून पुन्हा लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांकडून पालिका प्रशासनाला पाहिजे, तसे सहकार्य मिळाले नाही. यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत गेला. मागील आठ दिवसांमध्ये दरदिवशी शंभरहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले. या कारणाने आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणाही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. तर सरकारी रुग्णालयासह खाजगी रुग्णालयेही रुग्णांनी हाऊसफुल झाल्याचे चित्र आहे.