ठाणे -पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला शुक्रवारी ठाणे जिल्हासत्र न्यायाधीश आर व्ही ताम्हणे यानी शिक्षा सुनावली. त्यांना चार वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंडांची शिक्षा व दंड न भरल्यास आणखीन तीन महिन्याची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. बबलू रमेश पाटील (वय ४५ रा वेहळे) असे आरोपीचे नाव आहे.
पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला ४ वर्षांची सक्तमजुरी - Thane crime news
पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतील शुक्रवारी ठाणे जिल्हासत्र न्यायाधीश आर व्ही ताम्हणे यांनी चार वर्षाच्या सक्तमुरीची शिक्षा सुनावली आहे. निकाल लागताच पोलिसांनी आरोपीची रवानगी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात केली आहे.
भिवंडी तालुक्यातील वेहळे गावातील बबलू याचे तुर्भे, नवीमुंबई येथील रेश्मा ( ४० ) हिच्याशी लग्न झाले होते. या दांपत्याला दोन मुलीही आहेत. मात्र, बबलू हा पत्नी रेश्मा हिच्याशी क्षुल्लक कारणावरून वाद करून वाद घालत होता. तो पत्नीवर वारंवार संशय घेऊन तिचा छळ करत होता. त्यामुळे रेश्मा हिने पतीच्या जाचाला कंटाळून राहत्या घरात ३१ डिसेंबर २०१६ ला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे मृत रेश्मा हिच्या वडिलांनी बबलू याच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी कलम ३०६ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून बबलूला गजाआड केले होते.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक राहुल इंगळे, शांताराम महाजन आणि पोलीस पथकातील कर्मचारी जी.जी.पाचेगावकर यांनी करून सर्व साक्षी पुरावे न्यायालयासमोर सादर करत दोषारोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्याचा युक्तिवाद ठाणे जिल्हासत्र न्यायालयात सुरु होता. यात सरकारी बाजू महिला वकील एस. एच. म्हात्रे यांनी भक्कमपणे मांडली. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही.ताम्हाणे यांनी दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेऊन या गुन्ह्यात बबलू पाटील याला दोषी ठरवून चार वर्षांची सक्तमजूरी व १० हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास आणखीन तीन महिन्यांची कैद अशी शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने निकाल जाहीर करताच पोलिसांनी आरोपी बबलू याची रवानगी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात केली आहे.