ठाणे - मुंब्रा भागात काही समाजकंटकांमुळे डॉक्टरांकडून मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यात येत नाही. त्यामुळे मृतदेहाला घरात झाकून ठेवत नातलगांना मृत्युचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वणवण करावी लागत आहे. हा प्रकार ठाणे महानगर पालिकेच्या अनास्थेमुळे होत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अश्रफ (शानू) पठाण यांनी महासभेच्या पार्श्वभूमीवर चक्क कफन बांधून आंदोलन केले.
ठाणे महानगर पालिकेची महासभा आज(सोमवार) आयोजित करण्यात आली होती. या महासभेला सुरुवात होण्यापूर्वीच शानू पठाण यांनी हे आंदोलन केले. अंगावर कफन बांधून त्यांनी पालिका मुख्यालयात घोषणाबाजी केली. 'माझा नैसर्गिक मृत्यू झालाय; मला प्रमाणपत्र द्या' असे लिहिलेले कफन त्यांनी अंगावर चढवून घेतले होते.
मुंब्रा भागात असलेल्या काही समाजकंटकांनी माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करून डॉक्टरांना त्रास देण्याचे सत्र सुरू केले. त्यामुळे मुंब्रा येथील डॉक्टरांनी नैसर्गिक मृत्यू झालेल्यांनाही प्रमाणपत्र देण्यास नकार देण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, ज्यांच्या घरात दु:खाचा डोंगर कोसळलेला असतो, अशा लोकांनाही मृत्यूचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने मृतदेह घरातच ठेवून डॉक्टरांची शोधाशोध करावी लागत आहे. तर काही वेळा हजारो रुपये मोजून हे प्रमाणपत्र मिळवावे लागते.