ठाणे -केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कायद्या लागू केला आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी आयोजित केलेल्या मिटिंगला विरोध केल्याचा संशय घेत स्थानिक नगरसेवकाने त्याच्या समर्थकांसह एका इस्टेट एजंटसह आणखी एका जणाला लोखंडी रॉडने मारहाण केली. घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना भिवंडी शहरातील पिराणी पाडा येथे घडली. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैय्याज यासीन सैय्यद (वय - ४७) आणि इकबाल असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इस्टेट एजंटची नावे आहेत. तर सुफियान शेख असे हल्लेखोर नगरसेवकाचे नाव आहे.
भिवंडीतील पिराणीपाडा येथे नगरसेवक सुफियान शेख यांनी १७ जानेवारीला एनआरसी आणि सीएएच्या विरोधात मिटिंगचे आयोजन केले होते. यावेळी जखमी इस्टेट एजंट फैय्याज आणि इकबाल हे दोघे मिटींगला गैरहजर राहिले होते. यामुळे या दोघांबाबत नगरसेवक सुफियान यांच्या मनात संशय निर्माण झाला होता. यामुळे त्यांनी कार्यकर्ते सलीम अंसारी, मसी अख्तर शेख आणि अरफात आदींसोबत संगनमत केले. बुधवारी रात्री गणेश सोसायटी, इंद्रायणी निवास येथे फैय्याज आणि इकबाल या दोघांना गाठून लोखंडी रॉड तसेच लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.