नवी मुंबई - जगभरात पसरलेल्या करोना विषाणूची लागण राज्यातही वेगाने पसरत आहे. या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी शासनाने राज्यभर अनेक प्रतिबंधात्मक उपायोजना लागू केल्या आहेत. मात्र काही खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या उपचारासाठी अवाजवी बिल आकारणी होत असल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या. त्यामुळे खासगी रुग्णालयांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय पनवेल महापालिकेच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे.
'कोरोना रुग्णांना अवाजवी बिल आकारल्यास खासगी रुग्णालयांवर होणार कारवाई'
कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी शासनाने राज्यभर अनेक प्रतिबंधात्मक उपायोजना लागू केल्या आहेत. मात्र काही खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या उपचारासाठी अवाजवी बिल आकारणी होत असल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या.
खासगी रुग्णालयांकडून कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांना अवाजवी बिल आकारण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याच्या तरतुदीनुसार अधिसूचना जारी केलेली आहे.
आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पब्लिक ट्रस्ट म्हणून नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांना रुग्णांना बिल आकारणी बाबत व रुग्ण सेवेबाबत सविस्तर आदेश दिलेले आहेत. शासनाने खासगी रुग्णालयांचे ८० टक्के बेड्स शासकीय नियंत्रणाखाली ठेवण्याबाबत काही आदेशही दिले आहेत. त्यानुसार खासगी रुग्णालयाचे लेखापरीक्षण होणार आहे. जर ही खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांना अधिक व अवाजवी बिल आकारणी करत असल्याचे निदर्शनास आल्यास या रुग्णालयांवर पनवेल महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल, असेही पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले आहे.