नवी मुंबई - कॉर्पोरेट कंपन्या व हॉटेलसाठी भाडे तत्वावर वाहने घेऊन ती परस्पर परराज्यात विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी 2 कोटी 2 लाख रुपये किमतीची वाहने हस्तगत केली आहेत.
नवी मुंबईतील नेरूळ येथे टोळीने ट्रॅव्हल्स पॉईंट कंपनीच्या नावाने ऑफिस सुरू केले होते. येथे भाडेकरार करून भाडेतत्त्वावर मूळ कागदपत्रासह वाहने घेतली होती. त्या वाहनांची परराज्यात विक्री करून फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे.
पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषद वाहनांची परराज्यात विक्री -
नवी मुंबई नेरुळ येथे ट्रॅव्हल्स पॉईंट कंपनी स्थापन करून भाडेतत्त्वावर वाहने घेऊन त्याची परराज्यात विक्री करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. संबंधित आरोपी हे सराईत असल्याने त्यांचा ठावठिकाणा, मोबाईल क्रमांक शोधणे पोलिसांपुढे एक आव्हान होते. या आरोपींचा शोध घेत असता, सत्यप्रकाश वर्मा उर्फ बाबू हा बोईसर परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने तेथे जाऊन पोलिसांनी शोध घेतला असता, तेथे त्याची पत्नी राहत होती. तो तिथे आल्यावर पोलिसांनी सत्यप्रकाश याला ताब्यात घेतले.
सत्यप्रकाशला ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथकाने तो राहत असलेल्या इमारतीत एक रूम भाड्याने घेतली व दिवसरात्र पाळत ठेवली. सातव्या दिवशी मोठ्या शिताफीने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपीची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याचे साथीदार आशिष पुजारी व अँथोनी पॉल हे बंगलुरूमध्ये असल्याचे समजले. पोलीस पथक रवाना करून 7 नोव्हेंबरला त्यांनाही बंगळुरूमधून अटक करण्यात आली. नेरुळ पोलीस ठाणे येथील गुन्ह्यात 16 वाहनांपैकी 81 लाख किमतीची वाहने गुजरात राज्यातील विविध पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय यांनी माल तस्करीमध्ये जप्त केली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
आरोपींना बंगळुरूमधून अटक -
गुन्ह्याच्या तपासात आत्तापर्यंत 2 कोटी 2 लाखांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. तपासादरम्यान गुजरात येथून चोरीच्या गाड्यांची विक्री करणारे मोहमद वसीम फरीद शेख (33) व जावेद अब्दुल शेख (46) यांनाही 19 नोव्हेंबरला अटक केली आहे. त्यांनी गुजरातमधील सुरत, अहमदाबाद, वापी, दमन या भागात गाड्यांची कमी किमतीत विक्री केली व काही गाड्या गहाण ठेवल्या असल्याची कबुली दिली आहे. तसेच सर्व आरोपींनी संगनमताने नेरुळ, नवी मुंबई, पुणे येरवडा व मरोळ येथे ऑफिस उघडून गाड्यांची परस्पर विक्री केल्याची कबुली दिली.