ठाणे- डोंबिवलीतील एका 46 वर्षीय महिलेचा कोरोनासदृश्य आजाराने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र, ही महिला कोरोनाबाधित होती का? याबाबत त्या महिलेचा अहवाल आल्यानंतर सत्य काय ते समोर येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृत महिला डोंबिवलीत राहणारी असून ती १० मार्च रोजी बँकॉक येथून आली होती.
डोंबिवलीतील 46 वर्षीय महिलेचा कोरोनासदृश्य आजाराने मृत्यू - corona suspects
सदर महिला कोरोनाबाधित होती का? याबाबत त्या महिलेचा अहवाल आल्यानंतर सत्य काय ते समोर येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सदर महिलेला ३० मार्चला ताप, जुलाब, उलट्यांची लक्षणे जाणवल्यामुळे तिने खासगी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. डॉक्टरांनी तिला रूग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यांनतर ३१ मार्चरोजी महिला एका खासगी रुग्णालयात गेली असता तिला डोंबिवलीतील एम्स रूग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. तथापि, सदर महिलेस ताप व श्वसनाचा त्रास ही कोरोनासदृश्य लक्षणे जाणवत असल्यामुळे एम्स रूग्णालयाने तिला कस्तुरबा रूग्णालय येथे दाखल होण्याचा सल्ला दिला. परंतु, सदर महिला कस्तुरबा रूग्णालयात न जाता घरी गेली आणि तद्नंतर तिची प्रकृती गंभीर झाली व तिचा मृत्यू झाल्याचे समजते.
सदर मृत महिलेला उच्च रक्तदाब व मधुमेहाचा आजार होता. तिच्या ५ निकटवर्तीयांना ठाणे सिव्हिल रुग्णालय येथे तपासणीकरिता संदर्भित करण्यात आलेले असून त्यांचा अहवाल अद्याप अप्राप्त असल्याची माहिती, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लवंगारे यांनी दिली आहे.