ठाणे - महाराष्ट्रात मुंबई पुणे पाठोपाठ सर्वाधिक रुग्ण असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे ,कल्याण डोंबिवली ,नवीमुंबई ,मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात परिस्थिती गंभीर असताना भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनास यश प्राप्त होत आहे. आज केवळ १८ रुग्ण आढळून आल्याने शहरात समाधान व्यक्त केले जात आहे.
शहरात कोरोना रुग्ण दुप्पट वाढीचा कालावधी ७० दिवसांवर आला. मात्र तालुक्याच्या ग्रामीण भागात आरोग्य सेवा सक्षम नसल्याने शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाची परिस्थिती बिकट झाली आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच केंद्र व राज्य सरकारने विविध उपाययोजना हाती घेवून आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासोबत स्थलांतरीत मजुरांची भूक भागविण्यापासून त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करण्यापर्यंत अनेक सुविधा उपलब्ध केल्या. असे असताना भिवंडी शहर व ग्रामीण भागात उपाय योजना करण्यास एप्रिल महिन्यात प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे मे व जून महिन्यात या ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होऊन मृत्यूचे प्रमाण देखील वाढत गेले.
मात्र जुलै महिन्याच्या प्रारंभी आयुक्त डॉ.पंकज आशिया व मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. नितीन मोकाशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राबविलेल्या उपाययोजनांचा परिणाम जुलै महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात दिसून आला आहे. त्यामुळे आज शहरातील कोव्हिड रुग्णालयात बेड रिकामे असून एकही रुग्ण ऑक्सीजन शिवाय अथवा उपचाराअभावी मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाणही आटोक्यात आले आहे. शहरातील खाजगी कोव्हिड रुग्णालयांकडून होणारी रुग्णांची पिळवणूक थांबविण्यात प्रशासनाने कडक अंमल बजावणी सुरू केल्याने शहरातील वाढता कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे.तर ग्रामीण भागातील रुग्णांना सुरुवातीपासून रुग्णालयात दाखल होण्यापासून ते उपचार मिळविण्यासाठी झगडावे लागले आहे. परंतु आजही जिल्हाप्रशासन आरोग्य सुविधा मिळवून देण्यात पूर्णतः अपयशी ठरल्याने ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती गंभीर झाली आहे.
येत्या आठवड्यात गणेशपुरी येथील नित्यानंद रुग्णालयात ३०० बेडचे डिसीएचसी सुरू होणार असून कोनगाव येथे २०० तर काल्हेर येथे १०० बेडसह सवाद नाका येथे ७०० बेडचे कोव्हिड केअर सेंटर उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.सदरच्या आरोग्य सुविधा वेळीच केल्या असत्या तर ग्रामीण भागामध्ये कोरोनामुळे झालेली वाताहत नक्कीच थांबवता आली असती .तीन महिन्यांमधील कोरोना परिस्थिती दर्शविणारी सांख्यिकी माहिती...
भिवंडी महानगरपालिका क्षेत्र :- महिना एकूण रुग्ण मृत्यू
मे २०२० - ०१४७ ००७
जून २०२० - १७९४ १०२
जुलै २०२० - १६७७ ०८८