नवी मुंबई -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नामुळे प्रकृती खालावलेल्या कोरोनाबाधित महिला रुग्णाला तब्बल ७ तासानंतर ऑक्सिजन रुग्णवाहिका मिळाली. या प्रकारामुळे नवी मुंबई मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
नवी मुंबई मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार; मनसेच्या प्रयत्नाने तब्बल 7 तासांनी मिळाली रुग्णवाहिका - new mumbai corona death
प्रकृती खालावलेल्या कोरोनाबाधित रुग्णाला मनसेच्या प्रयत्नामुळे तब्बल ७ तासांनी ऑक्सिजन रुग्णवाहिका मिळाली. यामुळे नवी मुंबई मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
सानपाडा-पामबीच येथील कोरोनाबाधित महिला रुग्ण गेल्या ४ दिवसांपासून नवी मुंबई मनपाच्या निर्यात भवन, तुर्भे सेक्टर १९, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत होत्या. मात्र, रविवारी रात्रीपासून त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावली. त्यामुळे येथील कोविड केअर सेंटरमधील डॉक्टरांनी या सेंटरमध्ये ऑक्सिजन पाईपलाईन नसल्याने त्यांना वाशी येथील मनपाच्या सिडको कोविड सेंटरमध्ये शिफ्ट करण्याचा सल्ला त्यांच्या नातेवाईकांना दिला. मात्र, या महिला रुग्णाला रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून ऑक्सिजन रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यासोबत त्यांचे पदाधिकारी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. त्यानंतर मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करुन त्या महिला रुग्णाला ऑक्सिजन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.
मनसेच्या प्रयत्नामुळे त्या महिला रुग्णाला तब्बल ७ तासानंतर ऑक्सिजन रुग्णवाहिका मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी मनसेचे विशेष आभार मानून समाधान व्यक्त केले. मात्र, अजूनही कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णवाहिकेसाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याने मनपा प्रशासनाच्या गलथान कारभाराचा मनसेचे गजानन काळे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. लोकांचे जीव आता स्वस्त झाले आहेत का? असा सवाल उपस्थित करत यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लवकर मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेणार असल्याचे काळे यांनी सांगितले.