ठाणे - कोरोना पॉझिटिव्ह असलेला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी क्वारंटाईन केंद्रातून गर्दीचा फायदा घेऊन फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या फरार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी बक्षीस जाहीर केले आहे. तर याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बाळू खरात (वय, ४९ ) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
कल्याण - भिवंडी रोडवरील राजणोली नाका बायपास येथील टाटा आमंत्रण मधील टोलेजंग इमारतीमध्ये कोरोना संशयित व बाधितांसासाठी शासकीय क्वारंटाईन केंद्र आहे. या केंद्रात कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सुमारे एक हजारांच्यावर कोरोना संशयित व बाधितांवर उपचार सुरू आहेत. कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसापूर्वीच फरार आरोपीने एका व्यक्तीचा खून केला होता. त्याच खुनाच्या गुन्ह्यात बाळू खरात याला अटक केली असता, १६ जूनला त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासूनच त्याला कोरोनाच्या उपचारासाठी टाटा आमंत्रण येथील क्वारंटाईन केंद्रात पोलिसांच्या देखरेखी खाली ठेवण्यात आले होते.