ठाणे - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत नव्याने कोरोना बाधीत दोन रूग्ण आढळून आल्याने आतापर्यंत महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या ८ झाली आहे. खळबळजनक बाब म्हणजे यातील एका बाधित रुग्णाने लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती. त्या लग्न सोहळ्यात महापौर कुटुंबासह उपस्थित होत्या. त्यामुळे महापौरांना कुटुंबासह होम क्वॉरंटाईन राहण्यास महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने सल्ला दिला आहे.
महापालिका हद्दीतील आज दोन नवीन रुग्ण आढळून आले आहे. एक कल्याण पूर्व तर दुसरा डोंविबली पूर्व परिसरात राहणारे आहेत. दोन्ही रुग्णांच्या परिसरात महापालिकेच्या वतीने त्या परिसरात आरोग्य केंद्रामार्फत कार्यवाही सुरू असून, राज्य सरकारच्या सुचनांप्रमाणे नियोजन करण्यात येऊनही कार्यवाही पुढील १४ दिवस घरोघरी जाऊन राबविण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
कल्याण पूर्वेतील रुग्ण हा आयर्लंडवरून आला असल्याची पालिका प्रशासनाला माहिती मिळाली आहे. खळबळजनक बाब म्हणजे हा रुग्ण १८ मार्चला डोंबिवलीतील एका हळदी समारंभ तसेच १९ मार्चला जुनी डोंबिवली ग्राऊंड येथील आयोजित लग्न सोहळ्यास उपस्थित असल्याचे समोर आले आहे. याच लग्न सोहळ्याला बहुतांश राजकीय नेत्यांसह अनेक नगरसेवक आणि महापौर वनिता राणे यांनी कुटुंबासह हजेरी लावली होती.
या दोन्ही रुग्णांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. तसेच जुनी डोंबिवली ग्राऊंड येथील लग्न सोहळयास तसेच हळदी कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी त्वरित १४ दिवस होम क्वॉरंटाईन करावेत, व आजारसदृश्यन लक्षणे आढळ्यास महापालिका रुग्णालयात येवून तपासणी करुन द्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लवंगारे यांनी दिली आहे.