ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी परदेशवारी करून महाराष्ट्रात इंडस्ट्री आणण्याच्या मागे आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये अनेक उद्योगधंदे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशा सर्व उद्योगधंद्यांना सरकारी मदतीची फार मोठी अपेक्षा आहे. ही मदत मिळाली तरच अनेक उद्योगधंदे बंद होण्यापासून वाचू शकतात. आशियामधली सगळ्यात मोठी समजली जाणारी वागळे इंडस्ट्रियल इस्टेट आता हळूहळू आपली इंडस्ट्रीची ओळखही विसरू लागली की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर : भारतातील सर्वात मोठा इंड्रस्ट्रीयल एरिया वागळे ईस्टेटला ओळखले जायचे. मात्र आता हा इंड्रस्ट्रीयल एरिया हा डबघाईला आला असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीत सुरू असलेले अनेक उद्योग धंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कोरोनानंतर अनेक व्यवसाय बंद पडले तर नवीन व्यवसायिकांनासुद्धा कोरोनाचा फटका बसून महागाई वाढली. यामुळे आवक घटली त्यांचा परिणाम पूर्ण इंड्रस्ट्रीजवर पडलेला दिसून येतो. यावर व्यावसायिकांनी सरकारने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
उद्योगांची वाट खडतर : टिसाचे उपाध्यक्ष आशिष शिरसाट यांनीही उद्योगांच्या सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, कोविड काळात तर मोठा फटका उद्योगांना बसला. त्यावेळेस गावी गेलेले अनेक कामगार न परतल्याने कुशल कामगारांची कमरता भासू लागली. त्याचबरोबर गेल्या दोन एक वर्षात भारतातील स्टीलच्या किमती जवळपास तिप्पट झाल्या आहेत. कच्चा मालाच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात झाली. या दरांना नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असतानाच आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या परिणामामुळे विविध धातु आदी कच्चा मालाची दरवाढ झाली. त्यात आता रशिया व युक्रेन युद्धाची भर पडल्याने कच्चा मालाचे दर तिप्पट झाले आहेत. परिणामी उद्योगांची वाट खडतर बनल्याचे त्यांनी सांगितले.