मीरा भाईंदर(ठाणे) - मिरारोडमधील नया नगर पोलीस ठाण्यातील ३० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये पाच पोलीस अधिकारी तर २५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
नया नगर पोलीस ठाण्यात कोरोना मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाशी लढा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. मिरा रोडच्या नया नगर पोलीस ठाण्यामध्ये काम करणाऱ्या आतापर्यंत ३० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये आठ कर्मचारी कोरोनावर मात करून कामावर रुजू झाले आहेत, तर इतर कर्मचारी कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर काही कर्मचाऱ्यांनी स्वतःला घरातच विलगीकरण करून घेतले आहे. नया नगर पोलीस ठाण्यात एकूण १०२ अधिकारी कर्मचारी आहेत. यामध्ये ३० कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. तसेच कोरोनाची भीती सुद्धा निर्माण झाली आहे. कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांची देखील कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्यांचा वैद्यकीय अहवाल प्रतीक्षेत आहे. कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, तर पोलीस निरीक्षकांनीदेखील कोविड चाचणी केली आहे. त्यांचा वैद्यकीय अहवाल आज येणार असल्याची माहिती एका पोलीस कर्मचाऱ्यानी दिली.