ठाणे - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात जिल्ह्यातील 'संविधान बचाव संघर्ष समिती'च्यावतीने सोमवारी १६ मार्च रोजी विधानभवनावर लाँग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांसह नागिरकत्व संशोधन उपसमितीच्या सदस्यांच्या झालेल्या बैठकीत कोरोनाचा फैलाव होण्याच्या भीतीने 'संविधान बचाव संघर्ष समिती'च्या लाँग मार्चला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्या नागिरकत्व संशोधन उपसमितीचे सदस्य तथा राज्याचे मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
कोरोना इफेक्ट: सीएए विरोधातील लाँग मार्चला तात्पुरती स्थगिती, मंत्री आव्हाड यांची माहिती हेही वाचा -पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले ५ कोरोना बाधित रुग्ण; पुण्यातील रुग्णांचा आकडा १५ वर
केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनआरपी) देशभर लागू केला आहे. देशभर या कायद्याला विरोध होत असून, भाजप सरकार देशातील नागरिकांच्या मुळ समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून येथील नागरिकांना जनसुविधा देण्याऐवजी केवळ जाती धर्माचे राजकारण करीत असल्याचा आरोप, संविधान बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
समितीच्या वतीने मुंबई-नाशिक मार्गावरील राजनोली नाका येथून सोमवारी १६ मार्च रोजी लाँग मार्च काढण्यात येणार होता. यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लाँग मार्चमध्ये लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहावे, यासाठी ठाणे जिल्ह्यात विविध शहरात बैठका घेऊन जय्यत तयारी केली होती. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे राज्यात सर्वच सर्वजनिक कार्यक्रमावर राज्य शासनाकडून बंदी घालण्यात आहे. या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहात ठाणे जिल्ह्यातील संविधान बचाव संघर्ष समितीचे पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपसमितीचे सदस्य, तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांची लाँग मार्च संबधी बैठक आयोजित करण्यात आली होती.
एनपीआर संदर्भात राज्य शासनाने एक उपसमिती तयार करण्यात आली असून, या उपसमितीने ३० मार्चपर्यत लाँग मार्चला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती दिली असून, कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, १६ मार्चला निघणारा लाँग मार्च रद्द केल्याची सहमती बैठकीत झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपसमितीचे सदस्य आव्हाड यांच्याशी केलेल्या चर्चेअंती ठाणे जिल्हा संविधान बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपसमितीचा पुढील अहवाल येईपर्यंत आंदोलन स्थगित करीत असल्याचे सांगितले. यावेळी संविधान बचाव संघर्ष समितीचे शाम गायकवाड, सुरेश पाटील, रमीज फाल्के, किरण चन्ने, विजय कांबळे, मुफ़्ती हुजैफा, मौलाना अवसाफ फलाही, फ़ाज़िल अंसारी, इंजीनिअर जावेद, शादाब उस्मानी, गफ्फार शेख मोहम्मद अलीसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.