नवी मुंबई :नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा दिवसागणिक वाढत आहे. नवी मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. कित्येक ठिकाणी मास्कचा वापर होताना दिसत नाही, त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगही पाहायला मिळत नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांत नवी मुंबई परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. नागरिकांना आरोग्याची काळजी घ्या आणि नियमांचे पालन करा असे आवाहन करत, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देखील बांगर यांनी दिले आहेत.
पुन्हा एकदा वाढतेय रुग्णसंख्या..
नवी मुंबई परिसरातील कोरोना रुग्णसंख्या 58 हजारांच्या घरात पोहचली आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्यात कोरोनाच्या दररोजच्या रुग्ण संख्येचा आकडा दोन आकडी झाला होता. मात्र, आता पुन्हा तो पूर्वीसारखा तीन आकडी झाला आहे. तर आज (गुरुवार) नवी मुंबई शहरात 294 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. शहरात नागरिकांनी नियमांचं पालन केलं नाही, तर परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नियमांमध्ये आणलेल्या शिथिलतेमुळे नागरिकांमध्ये बेशिस्त कारभार वाढला आहे, ज्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांचे कारवाईचे आदेश..
बेलापूर, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे नेरुळ, सानपाडा जुईनगर परिसरातील परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. एपीएमसी मार्केटसह सर्वच बाजारपेठांमध्ये कोरोना नियमांचं सर्रास उल्लंघन होत आहे. मास्कचा वापर होत नाही. शिवाय लग्नसोहळे, राजकीय कार्यक्रम यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचाही सर्वांना विसर पडला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी आता अधिक कठोर भूमिका घेण्याचं ठरवलं आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश बांगर यांनी दिले आहेत.