ठाणे - यंत्रमाग व्यवसायाचे मँचेस्टर म्हणून भिवंडी शहराचे नावलौकिक देशभर आहे. यंत्रमाग व्यवसाय त्याचबरोबर कापड उद्योगामुळे देशातील कानाकोपऱ्यातील कामगार भिवंडीत वास्तव्यास आहेत. कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून यंत्रमाग व्यवसायास घरघर लागली आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कोरोना आटोक्यात आला. त्यांनतर दसरा - दिवाळी सारखे सण लागोपाठ आल्यामुळे लॉकडाऊनमुळे डबघाईला आलेल्या यंत्रमाग व्यवसायाची गाडी रुळावर यायला लागली होती. त्यातच आता पुन्हा राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन घोषित केल्याने यंत्रमाग व्यवसायाची आर्थिक घडी पुन्हा विस्कटण्याच्या मार्गावर आली आहे.
हेही वााचा -उद्धवच्या हातात राज्य आहे की, त्याच्यावर कुणाचं राज्य आलंय -राज ठाकरेंची कोपरखळी
यंत्रमाग कामगारांवर उपासमारीची वेळ
मार्च महिन्यांपासून राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोकेवर काढले आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता राज्य शासनाबरोबरच भिवंडी मनपा प्रशासनाने देखील शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत . रात्रीच्या संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. नियम पाळा अन्यथा लॉकडाऊन करावा लागेल, असा पवित्रा राज्य शासनाने यापूर्वीच घेतला होता. मात्र, आजही राज्य शासनाच्या लॉकडाऊन धोरणास अनेकांचा विरोध आहे. लॉकडाऊनमुळे भिवंडीतील यंत्रमाग व्यवसायाची अक्षरशः दाणादाण उडणार असून लॉकडाऊनमुळे यंत्रमाग व्यवसायाचे पार कंबरडेच मोडणार आहे. मागील वर्षभर लॉकडाऊन काळात यंत्रमाग व्यावसायिकांनी आपल्याकडे असलेल्या जमापुंजीत कामगारांना किमान पोटभर जेवण तरी दिले होते. मात्र, वर्षांभरापासून असलेल्या बंदमुळे आता अनेक यंत्रमाग व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहेत. परिणामी आता बंदच्या काळात कामगारांना जेवण व भत्ता देण्यात व्यवसायिक असमर्थ ठरणार असल्याने यंत्रमाग कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे.