मीरा भाईंदर (ठाणे ) -मिरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाकरिता नवीन अत्याधुनिक नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. सोमवारी महाराष्ट्र पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या उपस्थितीत या कक्षाचे उदघाटन पार पडले.
१०० ऐवजी ११२ नियंत्रण कक्ष दूरध्वनी -
मिरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर या क्षेत्राकरिता स्वतंत्र नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. हा कक्ष मिरा रोड येथील पोलिस आयुक्तालय इमारती मधील दुसऱ्या मजल्यावर उभारण्यात आले आहेत. या नियंत्रण कक्षात अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला असून या कार्यालयाच्या निर्मितीकरीता तीन महिन्याचा कालावधी लागला आहे. विशेष बाब म्हणजे आता पोलिस मदतीकरिता १०० दूरध्वनी क्रमांक लावण्याऐवजी ११२ हा नवीन क्रमांक ठरवण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना पोलिस मदतीसह रुग्णवाहिका आणि अग्निशमन विभागाची देखील मदत प्राप्त होण्यास मदत होणार आहे.
कंट्रोल नंबर १ मार्च पासून सुरू -
अत्याधुनिक जीपीएस यंत्रणेचा समावेश या नियंत्रण कक्षात असल्यामुळे एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी तात्काळ बीड मार्शल पाठवण्यात मदत होणार आहे. त्यामुळे गुन्हेगारीसह शहरावर नियंत्रण मिळवणे सोपे होणार असून या कक्षाचा वापर १ मार्च पासून होणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तालयातील पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.