ठाणे- मीरा भाईंदरच्या मुख्य मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना वाट मिळणे अवघड झाले आहे. त्याचप्रकारे दुचाकी वाहनांचे अपघात वाढले असल्यामुळे भविष्यात गंभीर दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील खड्डे बुजवण्याकरिता पालिका प्रशासन कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु, कामातील हलगर्जीपणामुळे हे खड्डे योग्य पद्धतीने बुजवले जात नाही. तसेच, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक भागात खड्डे बुजवण्याचे कामच झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. प्रामुख्याने मिरा रोड स्थानकाबाहेरील परिसर, घोडबंदर मार्ग आणि मिरा भाईंदर मुख्य मार्गावर खड्डे अधिक आहेत.
धक्कदायक बाब म्हणजे, या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असल्यामुळे भविष्यात गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिरा भाईंदर मुख्य मार्गावरील हा रस्ता मिरारोड व भाईंदरला जाणारा रस्ता असून या रस्त्यावर सद्या मेट्रोचे काम सुरू आहे, त्यामुळे अगोदरच हा रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावरून शहराच्या इतर भागात जाणारे रस्ते आहेत. यामुळे या रस्त्याला विशेष महत्त्व आहे. काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे रस्ते सर्वत्र खड्डेमय झाले आहेत. काशीमिरा, प्लेझेंट पार्क, हाटकेश, सिल्व्हर पार्क, एस.के.स्टोन, बेव्हरली पार्क, शिवार गार्डन, दीपक हॉस्पिटल, गोल्डन नेस्ट फाटक रोड या भागात मोठमोठे खड्डे असल्याने वाहन चालकांना खड्ड्यातून वाहने चालवताना मोठा त्रास होत आहे.