ठाणे- सर्वत्र महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यात मटणाचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. त्यामुळे मटणप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यात देखील गरिबांना परवडणाऱ्यासाठी मटणाचे दर नियंत्रित ठेवावे, अशी मागणी करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव के. वृषाली यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
कोल्हापूरच्या धर्तीवर ठाण्यात मटण दरवाढ, काँग्रेस आक्रमक - ठाणे जिल्हा बातमी
मटणाची अवाजवी भाववाढ आणि मटणविक्रेत्यांकडून ग्राहकांची होत असलेली फसवणूक यास आळा न घातल्यास काँग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा के. वृषाली यांनी दिला आहे.

आजपर्यंत मटणाचे भाव कमी झाल्याचे कधी कुठे वाचनात किंवा ऐकण्यात आलेले नाही. मटणाचे वाढते भाव लक्षात घेता गोरगरीबांच्या ताटातून मटण कधीच हद्दपार झाले आहे. त्यात सर्वसामान्यांना मटण घेताना शंभर वेळा विचार करावा लागतो. तसेच मटणप्रेमी मटणाशिवाय जगू शकत नाहीत, हे मटणविक्रेत्यांनी हेरले आहे. त्याचाच ते गैरफायदा घेतात. त्यामुळे सरकारने याबाबत मटणप्रेमींना दिलासा द्यावा, अन्यथा नाईलाजास्तव तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या ठाणे सचिव के. वृषाली यांनी दिला आहे.