महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हातावर पोट असणाऱ्यांना आधार देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील ... - सामूहिक भोजन छावण्या उभ्या

मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी अधिक जोमाने प्रयत्न सुरू झाल्याची माहिती जिल्हा अधिकारी कार्यलयातून देण्यात आली आहे. सरकार तसेच स्वयंसेवी संस्था, नागरिक यांच्या एकत्रित सहभागातून सामूहिक भोजन छावण्या उभ्या राहिल्याचेही सांगण्यात आले.

migrant workers in Thane
हातावर पोट असणाऱ्यांना आधार

By

Published : Apr 16, 2020, 7:19 PM IST

ठाणे - परराज्यांतून मुंबई, ठाणे क्षेत्रात आलेल्या मजुरांना लॉकडाऊन वाढल्याने घराची ओढ लागली आहे. यामुळे हजारो मजुरांनी शेकडो किलोमीटर लांब असलेल्या मुळ गावी पायी निघाले आहे. या मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी अधिक जोमाने प्रयत्न सुरू झाल्याची माहिती जिल्हा अधिकारी कार्यलयातून देण्यात आली आहे. सरकार तसेच स्वयंसेवी संस्था, नागरिक यांच्या एकत्रित सहभागातून सामूहिक भोजन छावण्या उभ्या राहिल्याचेही सांगण्यात आले.

कोकण विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये ५२ हजार मजुरांच्या निवारा व भोजनाची सोय करण्यात आली आहे. तर ठाण्यात विविध निराधार, मजूर यांच्यासाठी मिळून दिवसाला ४७ हजार जणांना कम्युनिटी किचन संकल्पनेद्वारे जेवण पुरवले जात आहे. शासकीय तसेच स्वयंसेवी पातळीवर ठाणे, नवी मुंबई, कल्याण, अंबरनाथ, तळोजा अशा विविध ठिकाणी सामूहिक भोजनछत्रांची सेवा सुरू झाली आहे.

हातावर पोट असणाऱ्यांना आधार

ठाणे शहरातील मजूर, विस्थापित व बेघरांना निवारागृह, अन्न-पाणी, वैद्यकीय सुविधा देण्यासाठी महापालिकास्तरीय नियंत्रण समिती स्थापन करण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे. शहरामध्ये विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि स्थानिक नागरिकांकडून दिवसाला ४७ हजार गरजूंना अन्नपुरवठा केला जात आहे. महापालिका क्षेत्रात प्रभाग समितीनिहाय कम्युनिटी किचन तयार करून त्यांच्यामार्फत स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून दैनंदिन अन्न शिजवून मागणीप्रमाणे त्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

शहरामध्ये सद्यस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे व शहरातील अनेक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विस्थापितांना, मजुरांना भोजनपुरवठा करण्यात येतो. त्याशिवाय रुस्तमजी बिल्डर्स, लायन्स क्लब, ठाणे सिटिझन्स ऑर्गनायझेशन, हॉटेल असो. ठाणे, आसिफ रोटरी क्लब, ठाणे, युनायटेड सिंघ सभा फाऊंडेशन, अक्षयपात्र, महिंद्र जिटीओ, समर्थ भारत व्यासपीठ, महेश्वरी मंडळ, साईनाथ सेवा महिला मंडळ, समन्वय युवा प्रतिष्ठान, लक्ष्मी कॅटरर्स, सोहम झुणका भाकर केंद्र, संघर्ष ग्रुप या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जवळपास ४७ हजार गरजू, विस्थापित आणि बेघर व्यक्तींना अन्न-पाणी पुरविण्यात येते आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे विस्थापित कामगार, बेघर व्यक्तींना दररोज अन्नाची पाकिटे पुरवली जातात. पालिका क्षेत्रात दररोज २५ ते २७ हजार इतक्या अन्नपाकिटांचे ७५ केंद्रांवरून वाटप केले जात असून यासाठी प्रशासनाच्या वतीने आठ ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दररोज ५० हजार अन्नाची पाकिटे तयार करण्याची क्षमता असलेल्या संस्थांचे जाळे उभे करण्यात आले आहे. आतापर्यंत ७५ केंद्रांद्वारे २ लाख ३८ हजार ३८० अन्नपाकिटे वाटण्यात आली. बालकांसाठी शिशुआहार व महिलांकरता सॅनिटरी नॅपकीनचे वाटपही करण्यात येत आहे.

अनेक कंपन्यांच्या सीएसआर फंडातून, दानशूर व्यक्तींकडून, विकासकांकडून मिळणारे धान्य कम्युनिटी किचन चालविणाऱ्या संस्थांना आठ दिवसांना लागणारा साठा पुरविला जात आहे. अंबरनाथमध्ये तहसील कार्यालय आणि नगरपालिका यांच्यातर्फे पूर्व भागातील सर्वोदय हॉल येथे एक हजार जणांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून नगरपालिकेच्या ४० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निराधार आणि स्थलांतरित कामगारांपर्यंत रोज जेवण पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे. येथे तयार होणारे जेवण डब्यात बंद करून शहरातील विविध भागांतील बेघर गरजू आणि स्थलांतरित कामगारांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. येथील कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर असे सर्व साहित्य देत या कर्मचाऱ्यांचीही काळजी घेतली जात आहे. या संचारबंदीच्या काळात जिल्ह्यामध्ये कुणीही भुकेले राहणार नाही यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा कार्यरत आहे. प्रत्येकाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. आपण काळजी घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details