मीरा भाईंदर(ठाणे) - ८ नोव्हेंबर रोजी मीरा भाईंदरमध्ये बाळासाहेब ठाकरे कला दालनाच्या कामासह विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने दुपारी १२.३० वाजता होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. बहुप्रतिक्षित असलेले मीरा भाईंदर येथील बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे भूमिपूजन होणार असल्याने या भव्य प्रकल्पाचे काम सुरु होणार आहे. यावेळी सर्व आमदार नगरसेवक,प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
अनेक कामांचा शुभारंभ
बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे भूमिपूजन यावेळी केले जाणार आहे. त्याचवेळी भाईंदर पूर्वेच्या बाळासाहेब ठाकरे मैदानावर तयार झालेल्या 'कोविड सेंटर'चे लोकार्पण देखील होणार आहे. त्याचबरोबर मीरा भाईंदर शहरासाठी 'कोविड टेस्टिंग लॅब'चेही उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. हे भुमिपूजन-लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, अशी माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. काशीमीरा प्रभाग क्रमांक 14 येथे BSUP योजना अनेक वर्षांपासून निधी अभावी रखडून पडली आहे. त्याला राज्य शासनाने दिलेल्या अर्थसहाय्यामुळे नव्याने बांधकाम सुरु होत आहे. त्या कामाचा शुभारंभही याचवेळी होणार आहे.