ठाणे -मनपाच्यासहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर ठाण्यात फेरीवाल्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई दिसून आली. पिंपळे यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यानंतर प्रमुख राजकीय नेत्यांनी कल्पिता पिंपळे यांची भेट घेऊन विचारपूस केली. तर आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्पिता पिंपळेंना फोन करून तब्येतीची विचारपूस केली. यावेळी महापौर नरेश म्हस्के आणि ठाणे पालिका आयुक्त विपीन शर्मा हे रुग्णालयात उपस्थित होते.
तुम्ही चिंता करू नका, लवकर बरे व्हा -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांचं कौतुक करत,"तुम्ही लवकर बऱ्या व्हा, बऱ्या झाल्यावर तुम्ही पुन्हा जे काम करणार आहात आता तुमच्याबरोबर आमचीसुद्धा ती जबाबदारी असेल", असा शब्द मुख्यमंत्र्यांनी पिंपळे यांना दिला. त्यानंतर कल्पिता यांनी बरे झाल्यावर लगेच रुजू होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी 'तुम्ही चिंता करू नका, लवकर बरे व्हा' असे सांगितले.