ठाणे : ठाण्यातील सिव्हील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. मुंबई ठाण्यासह राज्यभरात विकासाची आणि आरोग्याची कामे होत आहेत. त्यामुळे काहीजणांना पोटदुखी होत आहे. त्यांनी 'स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' येथे जाऊन मोफत उपचार घ्यावेत, अशी खरमरीत टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी साखरविषयात डाॅक्टरेट मिळवल्यामुळे काही लोकांची साखर वाढली, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा : कोरोना काळात सिव्हील रुग्णालयात सुपर स्पेशालिटी सुविधा देऊन रुग्णांचे प्राण वाचवल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. मुंबई ठाण्यासह राज्यभरात सुरु असलेल्या आरोग्य विषयक तसेच विकास कामांवरून काही जणांच्या पोटत दुखते आहे. अशा लोकांसाठी 'स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' आहे. तेथे त्यांनी मोफत उपचार करून घ्यावेत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला. 1936 साली उभारण्यात आलेले ठाण्यातील विठ्ठल सायन्ना रुग्णालयाने कात टाकली असून हे रुग्णालय पाडून या ठिकाणी 900 खाटांचे सुसज्ज असे वातानुकूलित जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालय उभे राहणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.