जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमले ठाणे रेल्वे स्थानक ठाणे :महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या रविवारी 9 एप्रिलला अयोध्येचा दौरा करत आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून सुमारे 10 हजार शिवसैनिक अयोध्येला जाणार आहेत. यापैकी तीन हजार शिवसैनिक ठाणे रेल्वे स्थानकाहून विशेष ट्रेनने रवाना झाले. यासाठी शिवसैनिकांनी आणि राम भक्तांनी ठाणे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी ठाणे रेल्वे स्थानकाचा परिसर जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमला होता.
विशेष ट्रेन रवाना -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे कल्याण विभाग प्रभारी गोपाळ लांडगे, स्थानिक नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी ठाणे स्थानकावर विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. दुपारी 4.40 च्या सुमारास जय श्री रामच्या घोषणांनी ही ट्रेन अयोध्येसाठी रवाना झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पारंपारिक भगवी शाल पांघरली होती. तुतारी वाजवत, तसेच संगीत बँड वाजवत मुख्यमंत्र्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरून विशेष ट्रेन रवाना केली आहे.
ठाणे रेल्वे स्थानकावर जमलेले शिवसैनिक
शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन : शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचे शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांचा येत्या रविवारी अयोध्या दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात एकनाथ शिंदे अयोध्या येथे उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराला भेट देणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील 10 हजार शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने आम्हाला अयोध्या नगरीला भेट देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला भगवान रामाच्या दर्शनासाठी नेण्याची सर्व तयारी केली आहे, त्यामुळे आम्हाला श्रीरामाचे दर्शन घेण्याचे सौभाग्य लाभले, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना शिवसैनिकांनी दिली.
ठाणे रेल्वे स्थानकावर जमलेले शिवसैनिक
घोषणाबाजीने ठाणे स्थानक दुमदुमले - ठाण्याहून अयोध्याला जाण्यासाठी जमलेल्या शिवसैनिकांमुळे ठाणे स्थानकावरील वातावरण भगवेमय झाले होते. यावेळी शिवसैनिकांकडून जय श्रीराम, एकनाथ शिंदे यांचा विजय असो, आवाज कुणाचा - शिवसेनेचा, या घोषणा दिल्या गेल्या. रेल्वे स्थानकावर ढोल ताशा पथक व बँजो पथकाच्या आवाजाने सर्व परिसर दुमदुमला होता. यावेळी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बॉम्ब नाशक पथकाकडून प्रवाशांच्या बॅगा तपासल्या गेल्या. तसेच रेल्वेमधून प्रवास करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची देखील काळजी घेण्यात आली आहे.
हेही वाचा :Shankaracharya on Hindu Rashtra: आम्हाला हिंदू राष्ट्र नाही रामराज्य हवे आहे, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती