ठाणे- शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ईडीने शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही. ईडीने केलेली कारवाई ही पूर्णपणे त्यांची कारवाई आहे. ईडी राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे शरद पवार यांच्यावर राज्य सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
ईडीच्या कारवाईविरोधात राज्यभर राष्ट्रावादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. तसेच ईडीने ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप राज्यभरातील नागरिकांनी केला आहे. त्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली. आज (बुधवारी) नवी मुंबईत माथाडी कामगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री आले होते. एकाच व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीचे स्पष्ट संकेत दिले.