ठाणे -डोंबिवली शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. याबाबत सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्रीपासून डोंबिवलीवर प्रदूषणाचे ढग जमा झाले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मात्र, कानावर हात ठेवत महानगरपालिकेकडे बोट दाखविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नाल्यांतून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे शहरात दुर्गंधी पसरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मागील पंधरा दिवसांपासून रोज सकाळी नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना देण्यात आली. महानगरपालिकेकडून खाडीत सोडल्या जाणाऱ्या घरगुती सांडपाण्यामुळे थंडीच्या काळात सकाळच्या वेळी दुर्गंधी पसरत असल्याचे मंडळाने म्हटले आहे. मात्र, थंडीमुळे दुर्गंधी वाढत असेल तर मागील दोन वर्षांत इतका त्रास का नव्हता? असा सवाल त्रस्त नागरिकांकडून केला जात आहे.
डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 1 परिसरात रासायनिक सांडपाण्याचे चेंबर ओव्हरफ्लो होत असल्याचे समोर आले. या चेंबर्सवर काही पाईप टाकण्यात आले असून त्यातून सांडपाणी सोडले जात असल्याचे आढळून आले. हे सांडपाणी चेंबरमधून बाहेर येऊन दुर्गंधी पसरत असल्याचे निष्पन्न झाले. याकडे एमआयडीसी आणि एमपीसीबीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.