मीरा भाईंदर (ठाणे) - टाळेबंदीच्या शिथिलतेनंतर मिरा भाईंदर शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात कामांवर ये-जा करण्यासाठी बस सेवांचा वापर करतात. परंतु, महानगरपालिकेची स्वतंत्र परिवहन सेवा उपलब्ध असतानादेखील नागरिकांना वाहतुकीच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय परिवहन सेवाच ठप्प करण्यात आल्यामुळे पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
राज्य शासनाकडून टाळेबंदी नियमात शिथिलता करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आणि नोकरदार वर्गाची रहदारी सुरु झाली आहे. रिक्षा व इतर वाहतूक सेवा खर्चिक असल्यामुळे दळणवळण करण्यासाठी बस सेवेचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु, अपुऱ्या प्रमाणात असेलेली बससंख्या आणि वेळ वाया जात असल्यामुळे नागरीक त्रस्थ झाले आहेत. अशा परिस्थितीत मिरा भाईंदर महानगरपालिकेची स्वतंत्र परिवहन सेवा उपलब्ध असतानादेखील तिचा उपभोग करण्यात येत नसल्यामुळे प्रवासी वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन विभागात ७० बस उपलब्ध आहेत. शिवाय ३३८ कर्मचारी या विभागात कार्यरत आहेत. गेल्या वर्षी महासभेत परिवहन सेवा 'भागीरथी एमबीएमटी प्रा.लिमिटेड' या कंपनीला ठेकेतत्वावर चालवण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मोबदल्यात पालिकेला प्रति किलोमीटर मागे ३६ रुपये प्राप्त होणार असल्याचे नक्की करण्यात आले होते. २२ मार्च रोजी टाळेबंदी नियम लागू करण्यात आल्यामुळे प्रवाशांकरिता परिवहन सेवा बंद करण्याचा निर्णय प्रशासनामार्फत घेण्यात आला होता. ५ जून रोजी राज्य शासनाकडून टाळेबंदी नियमात शिथिलता आण्यात आल्यानंतर परिवहन सेवा नव्याने सुरु होणार असल्याची आशा प्रवासी वर्गामध्ये निर्माण झाली होती. परंतु, अद्यापही परिवहन सेवा ठप्पच असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.
मिरा भाईंदर शहरातील अनेक नागरिक दळणवळणाकरिता परिवहन सेवेचा वापर करतात. सध्या परिवहन सेवा कार्यरत नसल्यामुळे जवळच्या अंतरावरील प्रवास करण्याकरता नागरिकांना बीएसटी बस सुविधेवर अवलंबून राहावे लागत आहे. शिवाय बीएसटी बस संख्या अपुऱ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे नागरिकांचा बराच वेळ वाया जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर परिवहन सेवा वापरात आणावी, अशी मागणी करण्यात येत आहे.