ठाणे:स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी लागणाऱ्या मसाल्याचे व्यंजना मध्येही भाववाढ झाली आहे. मागच्या वर्षी ४०० रूपये किलो दराने विकले जाणारे दगडफूल यंदा किरकोळ बाजारात ४५० ते४७० रूपये किलोच्या घरात असल्याची माहिती नितिन वाघ यांनी दिली. उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली की, महिला वर्गाची गरम मसाला, गोडा मसाला, मालवणी, आग्री, घाटी मसाला तयार करण्याची लगबग सुरू होते. जुन्या पीढीतील वयस्कर महिला वर्षभर तिखट, मसाले यांची बेगमी करून ठेवत असत. मसाल्यांना जाळी पडू नये म्हणून काचेच्या बरणीत मसाला भरून त्यावर हिंगाचे खडे ठेवत होते. परंतू आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मिरच्या उन्हात वाळवून त्या दळण्यास देण्यापेक्षा बाजारात उपलब्ध रेडी टू मिक्स तिखट, मसाले खरेदी करण्यावर गृहिणींचा कल वाढला आहे.परिणामी होलसेल तसेच किरकोळ बाजारात लाल सुक्या मिरच्यांची मागणी कमी झाली असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
असा आहे मिरचीचा भाव:लाल मिरच्यांचे एकूण २७ प्रकार आहेत. यापैकी बाजारात तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश येथून विक्रीसाठी मिरची येतात. यामध्ये किरकोळ बाजारात चवीला तिखट तेलंगणाच्या गुंतुर मिरचीचा भाव १८० ते २२० रु, तेजा अर्थात लवंगी मिरची २८० ते ३०० रूकिलो, आकाराने वर्तुळाकार आणि थोडी स्पाईसी रसगुल्ला मिरचीचा भाव २२० ते २४० तर सगळ्यात जास्त महाग पण कमी तिखट काश्मिरी रेशीम पट्टा ६०० ते ७५० रू किलोच्या घरात असून हाॅटेल, रेस्टांरटमध्ये वापरल्या जाणाऱ्या संकेश्वरी ३८० तर बेडगी मिरची ४५० ते ६०० रूपये भाव असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तसेच बाजारात मिरच्यांच्या ठसक्या बरोबरच दगडफूल ४७० रूपये किलो, जिरे २५० किलो तर जिरा राईसची चव वाढविणारे शहाजिरेचा भाव ६८० रूपये किलोच्या घरात असल्याचे सांगितले. आगामी होळी नंतर मसाले, तिखट मसाला करताना गृहिणीच्या खिशाला महागाईची झळ बसणार आहे.