ठाणे : Children Missing Case : कल्याणमधील रामबाग परिसरात राहत असलेली तीन भावंड शाळेत जातो सांगून घरातून बाहेर पडली. ती शाळेत न जाता कल्याण रेल्वे स्थानकात येऊन तेथून आसनगाव लोकलने खडवली येथे नदीवर पोहचली. मात्र, घरी परतीचा प्रवास कसा करावा हे समजले नसल्याने ती खडवली परिसरात भटकत होती. तर दुसरीकडे मुले बेपत्ता झाल्याची तक्रार महात्मा फुले पोलीस ठाण्यात दाखल होताच, तीन भावंडांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि पालकांनी तत्काळ हालचाली केल्या. अखेर ही मुले खडवली रेल्वे स्थानकात सुखरूप सापडल्याने मुलांच्या पालकांचा जीवात जीव आला.
नदीत पोहण्यासाठी शाळेला मारली बुट्टी :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या रामबाग भागात राहत असलेल्या विजय तुंबर यांची दोन मुलगे, एक मुलगी जोशीबाग भागातील एका शाळेत शिक्षण घेतात. बुधवारी दुपारी ही मुले नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली. शाळेच्या प्रवेशव्दारावर त्यांना शिक्षकांनी पाहिले. शाळेला दांडी मारण्याच्या विचारात असलेल्या या मुलांनी मौजमजेसाठी पालकांना न सांगताच खंडवली नदीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शाळेत न जाता ही मुले कल्याण रेल्वे स्थानकात येऊन आसनगाव लोकलने खडवली रेल्वे स्थानकात उतरली आणि बाजुलाच असलेल्या भातसा नदीवर गेली. तेथे नदीत डुंबण्याचा आनंद लुटल्यानंतर संध्याकाळी ती घरी परतण्यासाठी खडवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाली. परंतु ती रस्ता चुकली आणि खडवली भागात फिरत राहिली.