ठाणे -13 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीच्या आईशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत, पीडितेवर 70 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही बाब पीडितेच्या शाळेमधील वैद्यकीय तपासणीमध्ये समोर आली. याप्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी आरोपीवर 'पोक्सो' कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करित नराधमाला बेड्या ठोकल्या. तुळशीराम आंबोरे असे आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा - अज्ञात टोळक्याकडून अट्टल गुन्हेगाराचा भरदिवसा खून
टिटवाळा पूर्व परिसरात आरोपी राहतो. मजुरीच्या कामानिमित्ताने मुलीच्या आईशी त्याची ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेऊन गैरकृत्य साधण्यासाठी मुलीच्या आईला टिटवाळ्यात घर भाड्याने घेण्यासाठी मदत केली. तिची आई इतर ठिकाणी घरकामासाठी सकाळी घरातून बाहेर जाऊन संध्याकाळी उशीरा येत असे. तसेच मुलगी शाळेतून आल्यानंतर ती घरी एकटी असल्याचा फायदा घेत जबरदस्तीने घरात घुसून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.
दरम्यान, मुलीच्या शाळेमध्ये वैद्यकीय तपासणीवेळी डॅाक्टरांना तीने घडलेला प्रकार सांगितला. त्यांनतर शिक्षकांनी तत्काळ मुलीच्या आईला सांगितले. याप्रकरणी आईने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करित नराधम तुळशीरामला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे करित आहेत.
हेही वाचा - पुण्यातील वारजे पुलाखाली बॅगेत आढळला मृतदेह