ठाणे :पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडीतील हनुमान नगर, कामतघर भागात चिमुरडा आई-वडिलांसह राहतो. घटनेच्या दिवशी त्याची आई सुंदरी रामगोपाल गौतम या घरात कपडे धुवत असताना त्यांचा दीड वर्षीय वर्षीय सिद्धांत घराबाहेर खेळत असताना त्याचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चिमुरड्यास एक लाखात विक्री :पोलीस पथकाने नेपाळ सीमेपर्यंत तपास करीत शोध मोहीम सुरू केली. यामध्ये एका मोबाईल क्रमांकाचा तांत्रिक तपास करीत संशयित आरोपी गणेश नरसय्या मेमुल्ला याला कामतघर परिसरातून ताब्यात घेऊन त्याकडे कसून चौकशी केली असता त्याने मूल चोरी करून 1 लाख 5 हजार रुपयांना विक्री केल्याचे कबुल केले. त्यानंतर पोलीस पथकाने भिवंडीतील पद्मानगर नवजीवन कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या आरोपी भारती सुशील शाहु आणि आशा संतोष शाहु या दोघींना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून चिमुरड्याची सुखरूप सुटका केली. पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी चिमुरड्यास आई-वडिलांच्या स्वाधीन करून या तिघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत.
मूल नसल्याने चिमुरड्याचे अपहरण ?
आरोपी भारती सुशील शाहु आणि आशा संतोष शाहु या दोघी बहिणी असून आरोपी आशा हिला मूल नसल्याने तिने मूल विकत घेण्याचा निर्णय घेतला. तो तिने बहीण भारतीस बोलून दाखवला. त्यानंतर भारतीची ओळख आरोपी गणेश नरसय्या मेमुल्ला यासोबत असल्याने त्यांनी वर्षभरापूर्वी हा कट रचून चिमुरड्याचे अपहरण करून विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरोपी गणेश मेमुल्ला याने हनुमान नगर परिसरात टेहळणी करून लहान मूल हेरले. त्यामध्ये सिद्धांत हा त्याच्या नजरेत आला आणि त्याने त्याचे अपहरण करून विक्री केल्याचे तपासात उघड झाले.