ठाणे : महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या 18 मृत्यूंच्या प्रकरणाची चौकशी केली जातेय. यासाठी सरकारने 9 सदस्यांची चौकशी समिती नेमली आहे. या समितीची पहिली बैठक ठाणे महापालिकेच्या अरविंद पेंडसे सभागृहात झाली. ही बैठक जवळपास 5 तास चालली.
10 दिवसात अहवाल मागितला : मागील आठवड्यात ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात एकाचदिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर आठवड्याभरात 27 रुग्ण दगावले. या मृत्यू प्रकरणामुळे कळवा रुग्णालय विरोधी पक्षाच्या टार्गेटवर आले होते. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवा रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णांशी संवाद साधून मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती जाणून घेतली होती. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने 9 सदस्यांची समिती स्थापन केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या चौकशी समितीला 10 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर चौकशी समितीच्या वतीने तातडीने हालचाल सुरू करण्यात आली. या समितीची पहिलीच बैठक पार पडली असून सुमारे 5 तास ही बैठक सुरू होती. या बैठकीत मृत्यूंच्या कारणासोबतच इतर महत्वाच्या गोष्टींवरही चर्चा झाली. बैठक संपल्यानंतर समितीच्या सदस्यांनी कळवा रुग्णालयात जाऊनही रुग्णालयाची परिस्थिती जाणून घेतली. येत्या 10 दिवसांत म्हणजेच 25 ऑगस्टपर्यंत समिती अहवाल सादर करणार आहे.