ठाणे -कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या बुरशीजन्य रोगावर वेळीच उपचार करण्याची गरज असल्याने त्यासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अद्ययावत ऑपरेशन थिएटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (आज) यासंदर्भात तातडीची बैठक घेतली. या रोगाला अटकाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजानांबाबतही यात आढावा घेण्यात आला.
'या' रुग्णालयात होणार शस्त्रक्रिया
या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अद्ययावत ऑपरेशन थिएटर सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी दिले आहे. त्याशिवाय रुग्णांवर उपचार करण्यासाठी ईएनटी सर्जनची आवश्यकता असल्यामुळे ठाण्यातील नामवंत ईएनटी सर्जन डॉ. आशिष भूमकर आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी पालिकेला लागेल ते सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली एक विशेष टीम कळवा रुग्णालयात तैनात करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय रुग्णांना लागणारी औषधे, वैद्यकीय साधने आणि पुढे लागणारी ओपीडीची सुविधा पुरवण्याचे देखील यावेळी निश्चित करण्याचे करण्यात आले आहे. म्यूकरमायकोसिस या आजारासाठी लागणारी इंजेक्शन महाग असल्याने त्यांचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच त्यांचा पुरेसा साठा करण्याचे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी ठाणे महापालिकाआयुक्तांना दिले आहे.
हेही वाचा -नाशिककरांची चिंता वाढली, येवल्यात 4 तर लासलगावात 6 म्यूकरमायकोसिसचे रुग्ण