ठाणे :लव्ह प्यार और धोका या हिंदी चित्रपटाच्या कथेप्रमाणेच धक्कादायक घटना एका ३० वर्षीय महिला कॉन्स्टेबलच्या जीवनात घडली आहे. आर्मीत जवान असलेल्या २८ वर्षीय तरुणाशी पीडित महिला कॉन्स्टेबलची इंस्टाग्रामवर ओळख झाली, दोघात प्रेम जुळले. मात्र त्यानंतर प्रेमाच्या संधीचा फायदा घेऊन आर्मीत जवान असलेल्या प्रियकराने महिला कॉन्स्टेबल प्रेयसीला गुंगीकारक थंड पेय पाजून, तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
आरोपी प्रियकरावर गुन्हा दाखल: याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आर्मीत जवान असलेल्या प्रियकरावर, अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आकाश घुले असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. तो सद्या पुणे जिल्ह्यातील आर्मी कार्यलयात जवान म्हणून कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कॉन्स्टेबल कल्याण पूर्वेत कुटूंबासह राहते. ती मुंबई दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. तर आरोपी आकाश हा कल्याण पश्चिम भागात राहत असून तो मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवाशी आहे.
वर्षभर दोघांमध्ये प्रेमाचे सूत जुळले: त्यातच २०२१ साली पीडित महिला कॉन्स्टेबल हिची इंस्टाग्रामवर आरोपी आकाशची ओळख झाली होती. त्यानंतर दोघात मैत्री झाली. आरोपीने आपण आर्मीत जवान आहे असे सांगितले. तू कशी दिसते, तुला मला बघायचे आहे, असे बोलून प्रेमाच्या जाळ्यात पीडितेला अडकले. त्यानंतर वर्षभर दोघांमध्ये प्रेमाचे सूत जुळ्याने, त्यांचे सतत मोबाईलवर बोलणे होत होते. त्यातच मे २०२२ मध्ये आरोपी प्रियकर आकाश हा पीडितेच्या कल्याण पूर्वेतील घरी आला होता. त्यावेळी रात्रीच्या सुमारास पीडितेला गुंगीकारक थंड पेय पाजून तिच्यावर बलात्कार केला. मात्र बलात्काराच्या घटनेनंतर आरोपीने प्रेमाच्या आणा भाका देऊन, लग्न करण्याचे आमिष दाखवत पीडितेला शांत केले. त्यानंतर मात्र लग्नाच्या आमिष दाखवून पिडीतेबरोबर वर्षभर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.