ठाणेBawankule On Uddhav Thackeray :महाराष्ट्रात लोकसभा 2024 निवडणुकीची तयारी (Loksabha Election 2024) सुरू झाली आहे. आज ठाण्यात महाभियान 2024 (Maha Abhiyan) ची सुरूवात करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कामाचा लेखाजोखा ठाण्यातील साडेतीन लक्ष घरी पोहोचणार आहे. यातून मतदारांना मतदानासाठी तयार करण्याचा ठाण्यात प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मिशन 45 सुरू झालं असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नाकर्तेपणामुळेच मराठा आरक्षण गेलं हे रेकॉर्डवर आहे, अशी टीका बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
निवडणुकांच्या तयारीचे बिगुल फुंकले : ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या जागा अजूनही कोणी मागितल्या नाहीत आणि कोणाला दिलेल्या नाहीत. आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी येत्या निवडणुकांच्या तयारीचं बिगुल फुंकलं आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या जागांचं वाटप शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपाचे नेते एकत्र येऊन ठरवतील. परंतु लोकसभेचे 45 खासदार निवडून आणायचा संकल्प केल्याची माहिती त्यांनी दिली. महायुतीचे पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराजित करतील दगाबाजी करणार नाहीत, असा विश्वास देखील त्यांनी वर्तवला आहे.
यांच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण गेलं :उद्धव ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण गेलं आणि त्यामुळे जरांगे पाटील सारख्यांना उपोषणाला बसण्याची वेळ आली. आपले सरकार कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यास सक्षम असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. राज्यात आणि देशात लोकसभा विधानसभेसह अनेक महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांमध्ये होणार असल्यानं सर्वच पक्षांनी चांगलीच कंबर कसली आहे. सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं चाचपणी सुरू केली आहे. तसंच जागावाटप कसं करावं याबद्दल रणनीती आखायला सुरुवात केली आहे. बावनकुळे यांनी ठाण्यात येऊन इथल्या पार्टी वॉरियर्स बरोबर भेट घेऊन चर्चा केली. भारतीय जनता पार्टीनं लोकसभा 2024 निवडणुकीची तयारी सुरू केली. कार्यकर्ते ठाण्यातील जवळपास साडेतीन लाख घरांपर्यंत पोचून पंतप्रधान मोदी यांच्या कामाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहेत.
जागा वाटपाबाबत चर्चा करणार : महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व म्हणजे 48 जागांवर शिवसेना-भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच उमेदवार जिंकून येतील असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. महायुती मधील सर्वात मोठी डोकेदुखी ठरणाऱ्या ठाणे आणि कल्याण या जागांबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, या जागा अजूनही कोणी मागितल्या नाहीत. कोणाला दिल्या गेलेल्या नाहीत. जागा वाटपाबाबत तीनही पक्षाचे नेते एकत्रित चर्चा करतील व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार जागावाटप होईल.