ठाणे - मध्य रेल्वेने लोकल फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून त्यात कसारा लोकलच्या 22 फेऱ्या वाढवल्या आहेत. मात्र, या लोकल ट्रेनही कल्याण-कसारा स्थानकादरम्यानच्या 8 स्थानकांवर थांबणार नाहीत. या गाड्या केवळ टिटवाळा स्थानकात थांबत असल्याने 8 स्थानकांतील प्रवासी रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत असून लोकल सर्वरेल्वेस्थानकात थाबविण्यात याव्यात, अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावत असलेल्या लोकलमध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकलमध्ये अनेक विभागांतील अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवेश दिल्यानंतर लोकलमध्ये गर्दी अधिकच वाढली आहे. त्यातच आता सर्व बँक कर्मचाऱ्यांनाही प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे लोकल रेल्वेमधील वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोरोनाच्या संसर्ग पसरू नयेत, यासाठी पूर्वी 24 अप-डाऊन फेऱ्या होत्या. आता त्या वाढुन 46 करण्यात आल्याने कल्याण ते कसारादरम्यान प्रवास करणाऱ्या आसनगाव व कसारा येथील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.