ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका अनधिकृत बांधकामाचे माहेरघर ठरल्याने आतापर्यंत अनधिकृत बांधकामासंबधी लाच घेताना ३० अधिकारी - कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत विभागाने कारवाई केली. आता केडीएमसीचा मोठा अधिकारी पुन्हा एका बिल्डरसोबत हॉटेलमध्ये लेन-देन करीत असल्याचे सीसीटीव्ही फूटेज समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच एक डीपी रस्त्यात येणारी सहा मजली बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्यात आली. या इमारतीवर कारवाई न करण्यासाठी केडीएमसी अधिकाऱ्यांनी लाखो रुपये उकळले. मात्र, पुन्हा बिल्डिंग पाडण्यात आल्याचा आरोप बिल्डरने केला आहे. तर या प्रकरणाची चौकशी करुन दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले आहे. केडीएमसी अधिकारी दीपक शिंदे आणि पालिका उपायुक्त अनंत कदम अशी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
बिल्डरच्या आरोपाची केडीएमसी आयुक्तांनी घेतली गंभीर दखल
कल्याण पूर्व भागातील दावडी गावच्या परिसरात नवीन डीपी रस्त्यामध्ये येणाऱ्या सहा मजली बेकायदा इमारतीवर केडीएमसीने चार दिवसापूर्वी कारवाई केली. ही कारवाई वादाच्या भोऱ्यात सापडली आहे. कारवाईनंतर या इमारतीचा बिल्डर मुन्ना सिंग याने केडीएमसी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. या इमारतीवर कारवाई न करण्यासाठी अधिकाऱ्यानी वारंवार पैसे उकळले. काही दिवसांपूर्वीच एका हॉटेलमध्ये बिल्डर सिंग यांच्यासोबत केडीएमसी अधिकारी दीपक शिंदे, उपायुक्त अनंत कदम यांची बैठक झाली. या बैठकीचा सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. बिल्डरच्या आरोपाची केडीएमसी आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करुन दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.