ठाणे:आरोपी विशाल उर्फ सोनू हा शहाड भागातील बंदरपाडा परिसरात कुटुंबासह राहतो. त्यातच २३ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास मृतक गणेशप्रसाद हा शहाड-बंदरपाडा परिसरातून सायकलवर किराणा दुकानातून सामान घेऊन जात होता. यावेळी सायकल चालवत असताना त्याला दम आणि थकवा जाणवल्याने शहाड भागातील बंदरपाडा येथील श्रेया पॅलेस गल्लीत सायकल थांबून गल्लीत विश्रंतीसाठी थांबला होता. तर दुसरीकडे त्यावेळीच सर्वत्र कोरोनाचा प्रादुभाव मोठ्या प्रमाणात होता. नागरिक त्यावेळी घाबरून होते. त्यातच परिसरातील काही नागरिकांनी मृत गणेशप्रसादला तो थकलेल्या अवस्थेत बसल्याचे पाहून काही नागरिकांनी त्याच्याकडे विचारपूस केली होती.
उपचारादरम्यान मृत्यू :नागरिकांनी विचारपूस केल्याने मृत गणेशप्रसाद त्या ठिकाणावरून जात असतानाच, कोरोना रुग्ण असल्याच्या संशयातून आरोपी विशाल उर्फ सोनुने गणेशप्रसादच्या दिशेने खुर्ची भिरकावून फेकली. त्यामुळे गणेशप्रसादने घाबरून पळ काढला. अचानक त्या ठिकाणी असलेल्या गटारात पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी खडकपाडा पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला होता.
गुन्हा दाखल :३५ महिन्याच्या पोलीस तपासानंतर त्याच्या मृत्यूस कारणीभूत विशाल उर्फ सोनू असल्याचे समोर येताच, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात विशाल उर्फ सोनूवर गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. यशवंतराव करीत आहेत.