मीरा भाईंदर (ठाणे) -भाईंदर पूर्वेच्या प्रमोद महाजन समर्पित कोविड रुग्णालयात डॉक्टर गौतम टाकळगावकर यांना जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की करणे, सरकारी कामात अडथळा, अश्या एकूण २५ कलमांतर्गत नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही आरोपींना अटक करण्यात आली नसल्याने समाज माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
नेमकी घटना काय -
१४ एप्रिल रोजी रात्री ८ च्या सुमारास एका कोरोना बाधिक रुग्णाला भाईंदर पूर्वेच्या प्रमोद महाजन समर्पित कोविड रुग्णालय दाखल करण्यासाठी आणण्यात आले. मात्र, रुग्णालयाला कोणत्याही प्रकारची माहिती न देता रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात प्रवेश केला. त्यावेळी रुग्णालयात कर्तव्य बजावणारे रुग्णालय व्यवस्थापनाने ड्युटीवर असलेले डॉ. जय यांना या बाबत माहिती दिली. त्यावेळी डॉ. जय यांनी त्यांची तपासणी करून मृत असल्याचे सांगितले. रुग्णालयात दाखल करण्याअगोदर रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ. गौतम टाकळगावकर यांच्या कॅबिनमध्ये घुसून शिवीगाळ केली. तसेच ज्या ठिकाणी कोविड रुग्ण दाखल आहेत, त्याठिकाणी जाऊन आरडाओरडा केली. त्यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत. प्रकरण शांत केले. त्यानंतर डॉ.गौतम टाकळगावकर त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रुग्णाच्या नातेवाईकांविरूद्ध गुन्हा दाखल केला.