ठाणे : उल्हासनगर महापालिकेच्या ( Ulhasnagar Municipal Corporation ) जनसंपर्क अधिकाऱ्याने ( Public Relation Officer ) नोकरीत रुजू होताना जन्मतारखेत फेरफार करून नोकरी मिळविल्याचे तब्बल २९ वर्षाने निष्पन्न झाले. त्यामुळे मध्यवर्ती पोलीस ठाण्यात महापालिकेच्या सहायक आयुक्तांनी विविध कलमासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला ( UMC PRO Age Fraud ) आहे. एवढ्या वर्षानंतर गुन्हा दखल झाल्याने महापालिका वर्तुळात एकच खळबळ असून, युवराज भदाणे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे.
समाजसेवकामुळे भदाणेचा बोगस कारभार उघड..
गुन्हा दाखल असलेले युवराज भदाणे यांची कारकीर्द कायमच वादग्रस्त राहिली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी बडतर्फीची कारवाई झाल्याने त्या विरोधात न्यायालयात स्थगिती मिळवून महापालिका सेवेत पुन्हा रुजू झाले होते. असे असतांना अनेक वादग्रस्त प्रकारात वादात राहिल्याने त्यांच्यावर अनेकदा निलंबनाची कारवाई झाली. समाजसेवक दिलीप मालवणकर यांनी एका वर्षांपूर्वी भदाणे यांच्या पीएचडी पदवीवर आक्षेप घेऊन जन्मदाखल्याची चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे करून उपोषण केले होते. पीएचडी बोगस असल्याचे चौकशीत समोर आल्याने महापालिका आयुक्तांनी भदाणे यांच्या नावासमोरील डॉक्टर पद काढून टाकण्याचे आदेश दिले होते. शिवाय जन्मतारखेचा घोळ असल्याने एक चौकशी समिती स्थापन केली होती. या चौकशी समितीने संपूर्ण प्रकरणी चौकशी करून पालिका प्रशासनाला अहवाल सादर केला होता.