ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. याकाळात धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. असे असतानाही डोंबीवलीजवळच्या भोपर येथील लोढा परिसरातील जैन मंदिरात आज (गुरुवार) अनेक साधू आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हे सर्व साधू हे मुंबईमधील कंटेंटमेंट झोनमधून आले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे, तर याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केल्याने या वादावर तूर्त पडदा पडला आहे.
धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नसतानाही जमा झाले जैन साधू, आयोजकांवर गुन्हा दाखल - ठाणे कोरोना न्यूज
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. असे असतानाही डोंबीवलीजवळच्या भोपर येथील लोढा परिसरातील जैन मंदिरात आज (गुरुवार) अनेक साधू आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
एकीकडे कोरोनाचा कहर, तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून विविध आवाहने केली जात आहेत. संचारबंदी लागू करण्यात आली असून, धार्मिक कार्यक्रमांना बंदी करण्यात आली आहे. असे असूनही आज डोंबिवली येथील भोपर परिसरात धार्मिक विधीसाठी अनेक साधू मुंबई येथील घाटकोपर या कंटेंटमेंट झोनमधून आल्याचे स्थानिक नागरिकांनी समोर आणले आहे. हे साधू आले परंतु, त्यांनी परवानगी घेतली आहे का? त्यांची कोविड टेस्ट झाली आहे का? आणि जर एखादा साधू कोरोना पॉझिटिव्ह असेल तर याला जबाबदार कोण? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. वारंवार तक्रार करूनदेखील पोलिसांनी काही लक्ष दिले नाही आणि आज साधू मंदिरात आले असल्याचे स्थानिक महिलांनी सांगितले.
या प्रकाराने स्थानिक महिला भयंकर संतापल्या होत्या. मानपाडा पोलिसांनी या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आणि साधूंना डोंबिवलीत येण्यास मज्जाव केला असूनही साधू डोंबिवलीत आले होते. लॉकडाऊनमुळे सर्वत्र संचारबंदी असल्याने खासगी किंवा सार्वजनिक ठिकाणी लोकांनी जमण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही नियमांचा भंग करून सदर ठिकाणी गर्दी केल्यामुळे भद्रेश दोशी या संदप गावात राहणाऱ्या ट्रस्टी, पदाधिकाऱ्यांकर कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांनी दिली.