ठाणे : जिल्ह्यातील भिवंडीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. बोगस प्रमाणपत्र असताना वैद्यकीय सेवा देत नागरिकांच्या जीवाशी खेळ केल्याच्या प्रकार समोर आला आहे. उपचार करणाऱ्या या तीन बोगस डॉक्टरांविरोधात महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करत (Case filed against three bogus doctors) भिवंडी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
दवाखान्यातील साहित्य जप्त : लक्ष्मीनारायण रामचंद्र ईगा (४६), नरेश बाळकृष्ण चापडे (४९ ),साहबलाल हरहनाथ वर्मा (५२ तिघेही रा. भाग्यनगर, भिवंडी) या सर्वांचा पंचांसमक्ष पंचनामा करून चौकशी केली. दरम्यान, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची वैद्यकीय प्रमाणपत्रे अथवा कागदपत्रे नसल्याचे आढळून आल्याने त्यांच्याकडील विविध प्रकारची औषधे, इंजेक्शन व दवाखान्यातील साहित्य जप्त करण्यात आले. तसेच भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोउनि सुरेश राजे करीत आहेत.
बोगस डॉक्टरांमुळे आरोग्य धोक्यात : भिवंडीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे. मात्र कारवाईबाबत महापालिका प्रशासन सुस्त दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बनावट वैद्य अवैधपणे दवाखान्यांचा थाट मांडून बसले आहेत. भिवंडीत सन २०१५ पासून २०२२ पर्यंत अवैधरित्या दवाखाने चालवणाऱ्या 15 बोगस वैद्यांवर महापालिका प्रशासनाने धाड टाकून कारवाई करत शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
बोगस डॉक्टर पती पत्नीविरोधात गुन्हा : भिवंडीत बोगस डॉक्टर पती पत्नीविरोधात गुन्हा दाखल करत त्यांच्यावर अटकेची कारवाई २६ डिसेंबर रोजी करण्यात आली होती. एका तक्रारीनंतर भिवंडी शहरातील हमाल वाडा या परिसरात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दोघा पती-पत्नीवर महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी यांनी गुन्हा दाखल करून मोमीन मुशर्रफ नूर मोहम्मद अशरफी (४६) व रायला मुशर्रफ मोमीन (४०) या बोगस डॉक्टर पतीपत्नीवर गुन्हा दाखल करून अटक कारवाई नुकतीच करण्यात आली होती.
15 बोगस मुन्नाभाईंवर अटकेची कारवाई : बोगस डॉक्टरांना अटक केल्यानंतरही असे मुन्नाभाईंची दुकाने शहरांत सर्रासपणे सुरू आहेत. सर्वेक्षणानुसार शहरातील गल्लीबोळात तसेच सर्जन ठिकाणीही अवैधपणे रुग्णालये चालवली जात आहेत. दरम्यान मनपा प्रशासनाने शैक्षणिक अर्हता असणारे वैद्य शमसुजमा मो. हसन अन्सारी (गुलजारनगर, शांतीनगर), विरेंद्र बहादूर कैलास पटेल (माऊली कंपाउंड, भादवड), गोविंद कैलास भारद्वाज (टेमघर) ,लक्ष्मण कुमार आर. मेहता (टेमघर), हनिफ खान (घुंगटनगर), नसिमाबानो सय्यद (न्यू आझादनगर), लक्ष्मीनारायण रामास्वामी धावनपेल्ली (ब्रम्हानंदनगर), पंकज गिरीधर गोस्वामी (कापआली), अडवाणी (ताडाळी,कामतघर), आतीर मिस्त्री (ब्राम्हणआळी), रामलाल दलसिंगार वर्मा (,कामतघर) ,बिजू वर्गिस तौपिल (नवीवस्ती), वलसा बिजू तौपिल (नवीवस्ती) मोमीन मुशर्रफ नूर मोहम्मद अशरफी, रायला मुशर्रफ मोमीन अशा 15 जणांच्या अवैधपणे सुरू असलेल्या रुग्णालयांमध्ये छापा टाकून कारवाई करत या सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत.