ठाणे: भिवंडीतील कामगार वस्तीच्या शहरात असंख्य झोपडपट्टी विभागांमधून बोगस डॉक्टर सर्रासपणे सर्वसामान्य नागरिकांवर औषध उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळ करीत आहेत. याबाबत अनेक तक्रारी महापालिका आरोग्य विभागाकडे आल्या आहेत. अशाच दोन गरोदर मातांचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुत्यू झाल्याच्या तक्रारीनंतर भिवंडी शहरात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या आणखी तीन बोगस महिला डॉक्टरवर महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी यांच्या तक्रारीवरून तिन्ही बोगस डॉक्टरांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
दवाखान्यातील साहित्य जप्त: रिजवाना शफिक अन्सारी (वय ४५) , नुरजॉह इसुब खान (वय ५०) आणि नुसरत सुफियान खान अशी अटक केलेल्या बोगस महिला डॉक्टरांची नावे आहेत. शांतीनगर भागात बोगस डाॅक्टर व्यवसाय थाटून नागरिकांवर उपचार करत असल्याची माहिती भिवंडी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. जयवंत धुळे यांना मिळाली होती. त्यानंतर भिवंडी महापालिकेचे वैद्यकीय पथक आणि शांतीनगर पोलिसांनी येथील शांतीनगर मधील अमन मंजिल, गायत्रीनगर या भागात गुरुवारी पाहणी केली असता, ह्या तिघी बोगस महिला डाॅक्टर गरोदर मातावर उपचार करताना आढळून आले. त्यांची पंचांसमक्ष चौकशी केली असता त्यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र आढळून आले नाही. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडील विविध प्रकारची औषधे, इंजेक्शन व दवाखान्यातील साहित्य जप्त करण्यात आली आहे.