नवी मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात सध्या संचारबंदी करण्यात आली आहे. पण, काही लोक मिळेल त्या मार्गाने आपापल्या घरी परतत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर पळस्प फाटा येथे मालवाहु कंटेनर व टेम्पोमधून चक्क 63 जणांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांना पनवेल पोलिसांना ताब्यात घेतले आहे.
रविवारी (दि. 29 मार्च) पनवेल येथील नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी सुरू असताना कंटेनर (क्र. एम एच 04 जे यु 5355) व टॅम्पो (क्र. एम एच 43 बि जी 2043) मधून 22 पुरूष, 25 महिला व 16 मुले, असे एकूण 63 जणांची बेकायदेशीर वाहतुक करताना अढळले. कंटेनरमधून जाणारे मजूर हे कर्नाटकला आणि मालवाहू टेम्पोत असलेले मजूर साताऱ्याला निघाले होते. दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली असून धनराज शिवाजी अवरादे (वय - 45 वर्षे, रा. तोरंबा, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) व पांडुरंग लक्ष्मण पवार ( वय 49, रा. धावडशी, सातारा) या दोघांनाही सीआरपीसी कलम 41 प्रमाणे नोटीस देऊन सोडले आहे.