ठाणे-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावानंतर महापालिका, पोलीस यंत्रणेने सर्वच आस्थापना चालकांवर कोरोना नियमाचे कठोर निर्बंध 11 मार्चपासून लादले आहेत. त्यातच कल्याण-शीळ मार्गावरील 'इगो' नावाच्या ऑर्केस्टाबार मालकाने रात्री उशिरापर्यंत बारमधील नृत्य (छमछम) सुरू ठेवल्याचे एका व्हिडिओवरून समोर आल्याने अखेर पोलिसांनी या छमछम बारच्या मालकावर विविध कलमानुसार आज (दि. 13 मार्च) दुपारच्या सुमारास मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अशोक पुरषोत्तम पंडा, असे गुन्हा दाखल झालेल्या बार मालकाचे नाव आहे.
व्हिडिओ पोलीस अधिकाऱ्याच्या मोबाईलवर
ऑर्केस्ट्राच्या नावाने सुरू असलेला छमछमचा धांगडधिंगा रात्री 11 वाजल्यातनंतरही सुरूच असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने पोलीस व पालिका प्रशासनाने लादलेल्या कोरोना नियमाला या लेडीज बारवाल्यानी पायदळी तुडवल्याची चर्चा शहरात सुरू झाली. तर दुसरीकडे हाच व्हिडिओ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाईलमध्ये दिसताच त्यांनी चौकशी करून संबधित बारमालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.