महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पहिल्या वाहन चोरीचा डाव फसला; मात्र दुसऱ्या डावात 8 लाखांचे वाहन लंपास

कार टेस्ट ड्राईव्हसाठी नेण्याच्या बहाण्याने सोबत असलेल्या कर्मच्याऱ्याच्या डोळ्यात धूळ फेकत चोरट्याने ८ लाखाची एक्स यु व्ही 500 कार पळवली. या चोरीच्या काही तासाआधी सुद्धा त्याने उल्हासनगरातही असाच चोरीचा प्रयत्न केला होता, जे फसला. मात्र कल्याण येथे त्याच्या चोरीचा डाव साधला.

वाहन चोरी

By

Published : Jul 16, 2019, 10:03 AM IST

ठाणे - जिल्ह्यातील अनेक शहरात वाहने चोरींच्या सातत्याने घडत आहेत. त्यातच कल्याणातही वाहन चोरीची अजब घटना समोर आली आहे. वाहनांची ट्रायल घेण्याचा बहाणा करत चोरटे तब्बल 8 लाखांची कार घेऊन पसार झाले. विशेष म्हणजे या चोरट्यांचा वाहन चोरीचा पहिला डाव फसला, मात्र दुसऱ्या वाहन चोरीच्या डावात हे चोरटे यशस्वी झाले आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

चोरीबद्दलची माहिती देताना गोविंद सिंग


मिळालेल्या माहितीनुसार जयसिंग यांचा कल्याणामध्ये जुन्या चारचाकी वाहन विक्रीचा व्यवसाय असून उल्हासनगरमधील नंबर 3 येथे त्यांचे कार्यालय आहे. 19 जुलै रोजी रणजीत सिंग नामक व्यक्ती जयसिंग यांच्या शिवशंकर मोटर्स या दुकानात आला, आणि जुनी एक्स यु व्ही 500 कार खरेदी करण्याचे ठरविले. या कारची किंमत 8 लाख रुपये ठरवून त्या चोरट्याने 2 हजार रुपये जमा केले. माझा भाऊ येऊन गाडी बघेल, असे जयसिंग यांना सांगितले. मात्र, सायंकाळी ती व्यक्ती स्वतः आला आणि कार टेस्ट ड्राईव्हसाठी तुमचा एक माणूस सोबत द्या असे त्याने सांगितले. त्यानुसार जयसिंग यांनी दुकानात काम करणाऱ्या गोविंद सिंग या कर्मचाऱ्याला त्याच्यासोबत पाठवले. चोरटा स्वतः कार चालवीत होता थोड्यावेळाने त्याने कार गॅरेजला नेण्याचा बहाणा केला. यावेळी गोविंद सिंगला त्याच्यावर संशय आल्याने त्याने कार थांबवण्यास सांगितले, तेव्हा चोरट्याने कार हळू करत थांबविण्याचे नाटक केले, जेव्हा गोविंद सिंग हे कारमधून उतरायला लागले. तेवढ्यातच त्या चोरट्याने अचानक गाडीचा वेग वाढविला आणि कार घेऊन पसार झाला.


विशेष म्हणजे या चोरीच्या काही तासापूर्वी याच भामट्यानी उल्हासनगरातही अशाच पद्धतीने वाहन चोरीचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. ट्रायल घेण्याच्या बहाण्याने कार पेट्रोल पंपावर थांबवून त्यामध्ये दोन हजार रुपयाचे डिझेल भरले, त्यामुळे सोबत असलेल्या कर्मचाऱ्याला संशय आला आणि इथेच त्यांचा डाव फसला. मात्र कल्याण येथे त्याच्या चोरीचा डाव साधला.


याप्रकरणी गोविंद सिंग यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांची छबी कैद झाली आहे. पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. मात्र, या घटनेमुळे दुचाकी आणि चारचाकी विकणाऱ्या व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा भामट्यांपासून सावध राहण्याचा इशारा फसवणूक झालेल्या विक्रेत्याने इतर विक्रेत्यांना दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details