ठाणे :मुंबई-नाशिक महामार्गावर धावत्या एसटी बसच्या चालकाने प्रवासादरम्यान एसटीच्या साईड आरशामध्ये पाहिले असता, बसच्या मागील दोन्ही बाजूची चाके निखळून बाहेर येत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनतर क्षणाचाही विलंब न करता बसवर नियंत्रण मिळवून त्यांनी मोठी दुर्घटना टाळली. या बसमधील ५७ प्रवाशांचे जीव यामुळे बचावले. या घटनेमुळे एसटी महामंडळाकडून गाड्यांची नियमित तपासणी केली जाते का? या बसची तपासणी केली होती की, नव्हती? असा प्रश्न विचारला जात आहे. या घटनेमुळे एसटी महामंडळाचा बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
हेही वाचा -ठाण्यात मनसे आमदारांची कार पुलावरून थेट रेल्वे रुळावर कोसळली
इगतपुरी आगाराची एसटी बस (एमएच ४० वाय ५०६०) गुरुवारी सायंकाळी पाऊणेपाच वाजता कसारा व मुंबईकडे जाणाऱ्या ५७ प्रवाशांना घेऊन निघाली होती. ही एसटी बस शहापूर तालुक्याच्या हद्यीत मुंबई-नाशिक महामार्गावर धावत असताना चालक सुरेश मोतीराम साबळे हे बसचा तिसरा गिअर टाकण्याच्या तयारीत होते. त्यावेळी त्यांनी बसच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या साईड मिररमध्ये पाहिले असता त्यांना मागील दोन्ही बाजूची चार चाके बाहेर निखळू लागल्याचे दिसले. त्यांनी प्रसंगावधान राखत ही बाब वाहक दीपक साळुंखे यांना सांगत प्रवाशांना काही सांगू नका, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता गाडीवर नियंत्रण मिळवत बस थांबवत रस्त्याच्या कडेला उभी केली.