महाराष्ट्र

maharashtra

ठाणे जिल्ह्यात दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये घरफोड्यांचे सत्र सुरुच; इतरही गुन्ह्यांत वाढ

By

Published : Jun 20, 2021, 8:10 PM IST

गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन लागल्यामुळे अनेक गंभीर गुन्हे होण्याचे प्रमाण घटले आहे. मात्र, जिल्ह्यातील शहरी भागात दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये घरफोडी, जबरीचोरी, दुचाक्यासह सोनसाखळी असे १३०५ गुन्हे घडले आहेत.

thane crime news
दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये घरफोड्यांचे सत्र सुरुच

ठाणे - जिल्हा पोलीस आयुक्त क्षेत्रात ५ पोलीस परिमंडळ असून यामध्ये एकूण ३५ पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. त्यातच गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन लागल्यामुळे अनेक गंभीर गुन्हे होण्याचे प्रमाण घटले आहे. मात्र, जिल्ह्यातील शहरी भागात दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये घरफोडी, जबरीचोरी, दुचाक्यासह सोनसाखळी असे १३०५ गुन्हे घडले आहेत. या तुलनेत पहिल्या लॉकडाऊनच्या काळात केवळ ६४१ घरफोडीचे गुन्हे विविध पोलिस ठाण्याच्या नोंदीवरून समोर आले. चोरटे पोलिसांच्या तावडीत अजूनही सापडले नसल्याने पोलिसांना या अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करावी लागेल, असे पोलीसांकडून सांगितले आहे. मात्र, दुसऱ्या लॉकडाऊन काळात चोरट्यांनी जिल्ह्यातील विविध शहरात धुमाकूळ घातल्याचे जानेवारी २०२१ ते मे २०२१ या कालावधीत झालेल्या विविध पोलीस ठाण्याच्या नोंदीवरून दिसून आले आहे.

रिपोर्ट

हेही वाचा -प्रताप सरनाईकांच्या पत्रातील आरोप गंभीर; सर्वांनी त्याचा अभ्यास करावा - संजय राऊत

पहिल्या लॉकडाऊनमध्ये ४४ टक्के गुन्ह्याची उकल -

लॉकडाऊनमुळे देशाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असले, तरी त्याचा सकारात्मक परिणाम २०२० मध्ये दिसून आला. या वर्षात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचे प्रमाण घटले असल्याचे दिसून आले. मात्र, गेल्या वर्षांच्या तुलनेत म्हणजे जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ पर्यत या कालावधीत ९६४ घरफोडीचे गुन्हे घडले होते. त्यापैकी ३८४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले होते. मागील वर्षाच्या गुन्ह्यांच्या तुलनेत यावर्षी गुन्ह्यांचे प्रमाण बऱ्यापैकी घटले असल्याचे दिसून आले आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये ४४ टक्के गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये चोऱ्या, घरफोड्याच्या घटनेत दुपट्टीने वाढ झाली.

३० ते ३५ टक्केच गुन्ह्यांची उकल -

ठाणे पोलीस आयुक्त कार्यालय क्षेत्रात शहरी भाग मोठ्या प्रमाणात असून यामध्ये पाच पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यालय आहेत. यापैकी सर्वाधिक गुन्हे भिवंडी झोन २ मध्ये, तर सर्वात कमी गुन्हे झोन ५ मध्ये घडल्याचे आकडेवारीवरून दिसून आले. ठाणे जिल्ह्यातील ५ पोलीस उपआयुक्त परिमंडळापैकी मंडळ ४ परिमंडळमध्ये जानेवारी ते मे २०२१ पर्यंत १६९ दरोडांपैकी ९४ गुन्ह्यांची उकल, तर २७९ घरफोड्या पैकी ९५ गुन्ह्यांची उकल, तसेच ७९६ मोटरसायकल चोरींच्या गुन्हांपैकी १९१ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यासोबतच सोनसाखळी चोरीचे ६१ गुन्ह्यांपैकी १६ गुन्हे उघडकीस आणून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - ... म्हणून गॅंग प्रमुखाच्या नादाला लागू नका'; गुलाबराव पाटलांचा मुनगंटीवारांना टोला

सर्वाधिक गुन्हे भिवंडी झोनमध्ये -

भिवंडी पोलीस परिमंडळ २ मध्ये जानेवारी ते मे २०२१ पर्यंत २७ दरोड्यांच्या गुन्ह्यांपैकी १५ गुन्ह्यांची उकल, घरफोडीचे ६० पैकी २१ गुन्हे उघडकीस, तर मोटरसायकल चोरीचे १७९ पैकी ४० मोटरसायकली चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. मात्र, सोनसाखळीच्या ९ गुन्ह्यांपैकी केवळ १ गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच कल्याण पोलीस परिमंडळ ३ मध्ये ४५ दरोड्यांच्या गुन्ह्यांपैकी २३ गुन्हे उघडकीस आणले. तर ७० घरफोड्यांपैकी १७ गुन्ह्यांची उकल झाली. तसेच १७४ मोटरसायकल चोरी पैकी ४७ मोटरसायकली चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. मात्र, सोनसाखळीच्या १२ गुन्ह्यापैकीं केवळ ४ गुन्हेच उघडकीस आणण्यात कल्याण झोनच्या पोलिसांना यश आले. तर उल्हासनगर पोलीस परिमंडळमध्ये २९ दरोड्यांपैकी १२ उघडकीस आणल्या असून ५२ घरफोडीपैकी १८ गुन्ह्यांची उकल झाली आहे. तसेच १९७ मोटरसायकली पैकी ६५ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या. मात्र, ११ सोनसाखळी गुन्ह्यांपैकी केवळ २ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे सर्वात कमी गुन्हे झोन ५ मध्ये घडले असून ३७ दरोड्यांपैकी २१ गुन्ह्यांची उकल झाली आहे. तर घरफोडीच्या ३८ गुन्ह्यांपैकी २० गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच ८८ मोटारसायकली पैकी २२ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. मात्र, १७ सोनसाखळी चोरींच्या गुन्ह्यांपैकी ४ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने नागरिक घरातच -

पहिल्या लॉकडाऊनच्या कालावधीत बहूतांश नागरिक घरीच राहत होते. तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी टाळेबंदीची अंमलबजावणी करण्यात व्यस्त राहत होते. त्याच बरोबर घराबाहेर पडल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याने नागरिक सहजासहजी घराबाहेर पडत नव्हते. उन्हाळ्याच्या कालावधीत मुलांना सुट्ट्या असल्याने काही नागरिक फिरण्यासाठी जातात, या संधीचा गैरफायदा उचलून उन्हाळ्यामध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होते. गेल्या वर्षी मात्र नागरिक घरीच असल्याने घरफोडीच्या घटनांमध्ये घट झाली असल्याचे दिसून येते आहे. मात्र, दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये चोरट्यांनी हैदोस घातला असून या चोरट्यांच्या मागावर विविध पोलीस ठाण्याचे पथक तांत्रिक विश्लेक्षण, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तसेच खबऱ्यांचे जाळे पसरवून चोरट्यांच्या मुसक्या आवळत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा -Maratha Reservation : सोलापुरात मराठा आरक्षणासाठी 4 जुलैला भव्य मोर्चा; नरेंद्र पाटलांची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details