ठाणे -आपल्या पाळीव प्राण्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे नवीन फॅड आले आहे. मात्र डोंबिवलीत`हावश्या`नावाच्या बैलाचा वाढदिवस थाटामाटात साजरा करणे बैलाच्या मालकाला चांगलेच महागात पडले आहे. किरण एकनाथ म्हात्रे ( ३१ ) असे बैलाच्या मालकाचं नाव असून, त्यांच्यावर डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाकाळात बैलाचा वाढदिवस ऑर्केस्टाच्या तालावर
कल्याण – डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निर्बंध घातले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र तरी देखील डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव येथे म्हात्रे यांनी आपल्या बैलाचा वाढदिवस साजरा केला. गुरुवारी रात्री 12 सुमारास ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे महागडा केक आणि ऑर्केस्टाच्या तालावर मोठ्या थाटामाटात या बैलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
बैलाचा वाढदिवस पडला महागात, मालकावर गुन्हा दाखल पोलीस तपास सुरू
बैलाचा वाढदिवस साजरा करताना ५० पेक्षा अधिक जण या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कायक्रमस्थळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाले, एकाच्याही तोंडाला मास्क नव्हते. त्यामुळे बैलाचा मालक किरण एकनाथ म्हात्रे यांच्या विरोधात भादवी कलम २६९,२७०,१८८ महाराष्ट्र कोविड २०२० चे कमल ११, साथरोग प्रतिबंध अधिनियम कमल ३ सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कमल ५१ ( ब ) प्रमाणे विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.