ठाणे - दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हासनगर कॅम्प-३ येथील अंबिका सागर या इमारतीचा स्लॅब आज सकाळी सहाच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत नीरज सातपुते या अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळला; मलब्या खाली दबून अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू - उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळला
उल्हासनगर कॅम्प-३ येथील अंबिका सागर या इमारतीचा स्लॅब आज सकाळी सहाच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत नीरज सातपुते या अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. पावसाच्या सरी कायम असल्याने घरातील अत्यावश्यक वस्तू घेऊन रहिवाशांना इमारत सोडण्याची सूचना देण्यात आली आहे.
उल्हासनगर कॅम्प-३ मध्ये पवई परिसरात 'अंबिका सागर' ही पाच मजली इमारत आहे. या इमारतीत 25 सदनिकाधारक आणि पाच दुकाने असून, इमारतीच्या स्लॅबला गळती लागल्याने पत्र्याचे शेड लावण्यात आले होते. हे शेड काही ठिकाणी नादुरुस्त असल्याने, मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी इमारतीच्या टेरेसवर जमले होते. चौथ्या मजल्यावरील 401 क्रमांकाच्या सदनिकेतील तात्याराव सातपुते यांच्या बेडरुमच्या छताचा भाग कमकुवत झाला होता. शनिवारी रात्री सातपुते यांची पत्नी नातू नीरजसह त्याच खोलीत झोपल्या होत्या. आज सकाळी सहाच्या सुमारास स्लॅबचा काही भाग झोपलेल्या दोघांच्या अंगावर पडला.
घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत नीरजचा जागीच मृत्यू झाला तर त्याची आजी पंचशीला या गंभीर जखमी झाल्या आहेत.
उल्हासनगर महापालिका प्रशासनाने तात्काळ इमारत खाली करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पावसाच्या सरी कायम असल्याने घरातील अत्यावश्यक वस्तू घेऊन रहिवाशांना इमारत सोडण्याची सूचना देण्यात आली आहे.